वकिलांना पुरावे सादर करतांना न्यायनिवाडे व कार्यपद्धती माहित असणे गरजेचे, ॲड. महेश वासवाणी

 वकिलांना पुरावे सादर करतांना न्यायनिवाडे व कार्यपद्धती माहित असणे गरजेचे,  ॲड. महेश वासवाणी 



पाताळगंगा न्यूज ( संजय कदम )
पनवेल : १२ सप्टेंबर,

                कोर्टात किंवा कोणत्याही न्यायाधीकरणात अशीलाची बाजू मांडण्यासाठी पुरावे सादर करतांना पूर्वी झालेले निकाल व न्यायनिवाडे आणि कायद्याने सांगितलेली  कार्यपद्धती पूर्णपणे माहित असणे अतिशय  गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्चन्यायालयाचे विधिज्ञ ॲड. महेश वासवाणी यांनी पनवेल येथे केले.
             पनवेल वकील संघटनेच्या वतीने नवोदित वकीलांना न्यायपध्दतीत सतत होणारे बदल नवनवे निकाल व न्यायनिवाडे आणि कायद्याने सांगितलेली कार्यपद्धती यांची माहिती व्हावी यासाठी  व्याख्यानमाला सुरु केली आहे. पनवेल कोर्ट आवारात  पार पडलेल्या या मालेतील पहिले पुष्प  प्रसिध्द वक्ते ॲड. महेश वासवाणी यांनी आपल्या व्याख्यानातून गुंफले. त्यांनी आपल्या व्याख्यानात  पुरावा कायद्यातील कलम 65(ब) बद्दल बोलतांना सांगितले.
               कि, ई सिग्नेचर आणि डिजिटल पुरावे सादर करतांना वकिलांनी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल  विस्तृत माहिती दिली. पुढे त्यांनी जामीन, अंतरिम जामीन, आत्महत्या कधी सिद्ध होते?  चार्जशीट मधील चुका कशा शोधायच्या?  बलात्कार आणि पॉस्को खटल्यामध्ये वापरले जाणारे पुरावे, हुंडाबळी स्त्रीधन आशा केसमध्ये काय पुरावे सादर करणे गरजेचे आहे? त्या साठी कशी तयारी केली पाहिजे?  याबद्दल हि परिपूर्ण माहिती दिली. 
             यासाठी नजीकच्या काळातील केस लॉ,  न्यायनिवाडे यांचे विषयसूची नुसार स्वतः तयार केलेले चार्ट हि त्यांनी उपस्थित वकिलांना दिले. या नंतर झालेल्या चर्चा सत्रात वकिलाना प्रश्नोत्तराच्या स्वरुपातही माहिती दिली.
व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात  आयोजक तथा  पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ यांनी आपल्या भाषणात सांगितले कि नवीन आणि जुन्या सर्वच वकील सहकाऱ्याना कायद्यांमध्ये होणारे बदल तसेच नवीन कायदे यांची माहिती व्हावी यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. 
               यापुढे कायदे तज्ञांना पाचारण करून  वेगवेगळ्या विषयांवर  व्याख्यान आयोजित केले जातील. वकिलांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी वकील संघटना सर्वोतोपरी प्रयत्न करील अशी ग्वाहीहि त्यांनी उपस्थितांना  दिली.
            यावेळी पनवेल वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. संदीप जगे, सेक्रेटरी ॲड. प्रल्हाद खोपकर, जॉइंट सेक्रेटरी ॲड. सीमा भोईर, खजिनदार ॲड. धनराज तोकडे, सह खाजीनदार  ॲड. सुशांत घरत, ऑडीटर ॲड. विशाल मुंडकर,  कार्यकारिणी सदस्य ॲड. अमित पाटील, ॲड. भूषण म्हात्रे, ॲड. प्रगती माळी, ॲड. छाया म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. राजेश खंडागळे, ॲड. विकी दुसिंग, ॲड. सागर धोत्रे यांनी अथक परिश्रम घेतले जेष्ठ वकील ॲड. सुनिल तेलगे यांनी सर्व उपस्थितांचे  आभार मानले तर व्याख्यानमाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. दिपाली बोहरा यांनी केले.

Post a Comment

0 Comments

खोपोली,खरसुंडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी केला भारतीय जनता पक्षात प्रवेश