लाईन आळीतील श्री हनुमान मंदिरात श्रावणात सारीपाट खेळण्याची अनेक वर्षाची परंपरा कायम
संजय कदम
पनवेल : २३ ऑगस्ट,
पनवेल शहरातील लाईन आळीतील श्री हनुमान मंदिरात विश्वस्त कै.दशरथशेठ धोंडु कुरघोडे यांनी सुमारे ७०-८० वर्षांपूर्वी सुरु केलेला सारीपाटाच्या खेळाची प्रथा त्यांच्या तिसऱ्या पिढीनेही पुढे अबाधित ठेवली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हनुमान मंदिरात दर सोमवारी, गुरुवारी व श्री कृष्ण जन्माष्टमीला सारीपाटाचा डाव मांडला जात आहे.
महाभारत काळापासून खेळला जाणारा सारीपाटाचा हा खेळ आजही ग्रामीण भागात जपला जात आहे. आपले ग्रामीणपण सोडत शहराकडे वाटचाल केलेल्या पनवेल शहरात लाईन आळीतील श्री हनुमान मंदिरात विश्वस्त कै.दशरथशेठ धोंडु कुरघोडे यांनी सुमारे ७०-८० वर्षांपूर्वी सुरु केला होता. देशस्थ मराठा मंडळ ट्रस्टच्या श्री हनुमान मंदिरात फार पूर्वीपासून पनवेलवासी सारीपाट हा खेळ श्रावण महिन्यात दर सोमवार, गुरुवारी व श्री कृष्ण जन्माष्टमीच्या सप्ताहात रोज खेळला जात आहे.
त्या काळात पंचक्रोशितील शेकडो लोक हा खेळ खेळण्यासाठी यायची. कै दशरथशेठ धोंडु कुरघोडे यांच्या निधना नंतर सारीपाट खेळ त्यांचे चिरंजीव श्री हनुमान मंदिर पनवेलवासी समस्त देशस्थ मराठा मंडळ ट्रस्टचे मा.अध्यक्ष व माजी नगरसेवक स्व. लक्ष्मणशेठ दशरथशेठ कुरघोडे यांनी सुरु ठेवला. आज त्यांच्या निधनानंतर कुरघोडे कुटुंबाची तिसरी पिढी ट्रस्टचे सचिव कुणाल लक्ष्मण कुरघोडे व सदस्य कपिल भरत कुरघोडे यांनी आपली हि परंपरा जपत पुढे घेऊन जाण्याचे ध्येय जपले आहे.
चौकट -
हा खेळ दोन गटात खेळवला जात असल्यामुळे ज्या गटाच्या सोंगट्या सारीपाट़ाच्या मघ्यभागी जातील तो गट विजयी होतो. तर एका गटाने सोगटी मारल्यानंतर दुसऱ्या विरोधी गटाने त्या गटाची सोगटी मारली तर हा खेळ बरोबरीत सूटतो. तर काही वेळा दान जास्त पडल्यामुळे भूत उठते त्या वेळी या खेळाला मोठी गंमत येते. या खेळात एक डाव पूर्ण होण्यासाठी ४ तास लागतात. विशेष म्हणजे या खेळात पैश्याचा वापर केला जात नाही. आता आधुनिक काळात तरुणांच्या हातात स्मार्टफोन असताना सुद्धा कुरघोडे परिवारातील तरुणांनी दोन्ही गटाचे मुख्य खेळाडु सुभाष राऊत व नागेश भातणकर यांच्या समवेत ही परंपरा जोपासली आहे.
0 Comments