संघर्षातून तयार झालेली नवदुर्गा, दिपाली सतीश सावंत (सहाय्यक अध्यापक)

 संघर्षातून तयार झालेली नवदुर्गा, दिपाली सतीश सावंत (सहाय्यक अध्यापक)



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
१५ ऑक्टोबर,

          कमी वयात वडिलांचे छत्र गमावलेली, समज येते न येते तर संसारात पडलेली, लहानपणापासूनच संघर्षमय जीवनाची सुरुवात झाली, अभ्यासाची आवड असल्याने सहावीत नवोदयला प्रवेश मिळाला. अभ्यास करून मोठी स्वप्नं मी पाहू लागली. घरात सर्व भावंडात मोठी असल्याने खूप जबाबदाऱ्या  होत्या, वडील महसूल विभागात नोकरीला होते सर्व काही व्यवस्थित चालू असताना कुटुंबावर काळाने घाला घातला माझ्या मोठ्या स्वप्नांची पूर्ती करणारे माझे बाबा खूप कमी वयात हे जग सोडून गेले आणि सर्वकाही येथेच थांबले असे झाले! 


                     नवोदय विद्यालय मधेच सोडावे लागले. वाटलं जी-जी स्वप्न आपण पाहिली होती त्याचा आता पार चुराडा होणार !  पण आईने आणि वडिलांसमान काकांनी धीर दिला. शिक्षण चालू होते, डी.एड. झाले, आपली मुलगी सुखी कुटुंबात नांदली पाहिजे म्हणून सधन कुटुंबात काकांनी स्थळ जुळवले. डी.एड. होऊनही लग्नानंतर नोकरी लागली नव्हती व सासरचे कुटुंब सधन असल्याने बाहेर नोकरी करण्यास घरच्यांची फारशी सहमती नव्हती. पण आत्तापर्यंतचे माझे संघर्षमय जीवन आणि शिक्षणाप्रती असलेला स्नेह माझे पती सतीश यांनी जाणला आणि मला नोकरी करण्यास परवानगी दिली. गुणवत्तेनुसार निवड प्रक्रिया असल्याने वर्धा जिल्हा परिषद मध्ये सन २००६  मध्ये हिंगणघाट पंचायत समिती मध्ये नियुक्ती मिळाली. आनंद ओसंडून वाहत होता, नोकरीचे सर्व श्रेय मी माझ्या पतींना दिलं होतं. शिक्षकांच्या रिक्त जागा कमी असल्याने आदेशात कोल्ही गाव मिळाले होते. गटविकास अधिकारी यांचे कडून आदेश मिळाला. तत्कालीन ग.शि.अ. यांनी आम्हा सर्वांना कार्यालयात बोलावले आणि सांगितले की आपली गावे खूप दूर आहेत,  येण्या-जाण्यासाठी वाहनांची कसलीच सोय नाही तेव्हा आपण आज चार वाजता नंतर शाळेत कोणीही जाऊ नये. 
            ऐकून धक्काच बसला ! येण्या- जाण्याची सोय नाही, शहरापासून दूरचे गाव ! म्हटले आता आपली नोकरी करण्याची संधी नक्कीच जाणार ! मनामध्ये काहूर माजलं होतं, त्या दिवशी रात्रभर मला झोप लागली नाही कुठे असेल कोल्ही ! कशी असेल कोल्ही ! या विचारांनेच सगळी रात्र गेली. सकाळी-सकाळी घरून निघायचे असल्याने व घरापासून कोल्ही शंभर किलोमीटर पेक्षाही जास्त दूर असल्याने गाव पाहू व नोकरीचा निर्णय घेऊ ! असे कुटुंबात ठरले. सकाळी लवकरच आमच्या कारने आम्ही शाळेत रुजू व्हायला निघालो, नोकरी करण्याची संधी मिळाल्याने गाव जवळ असावे म्हणून मनात सारखे देवाजवळ प्रार्थना करत होते. आता घरून निघून तीन तास झाले होते पण अजून पर्यंत तरी कोल्ही गाव आले नव्हते, रस्त्यातील धानोरा गावात गाडी पोहोचली रस्ता संपला. लोकांना विचारले कोल्ही हे गाव कोठे आहे? तर त्यांनी सांगितले अजून सहा-सात किलोमीटरचा रस्ता आहे नंतर कोल्ही आहे ! कसाबसा आमची कार रस्ता काढत अर्ध्यात पोहोचली पण कोल्ही पर्यंत पोहचेल याची शास्वती वाटत नव्हती. 
               बऱ्याच वेळानंतर आम्ही कोल्ही गावात पोहोचलो, कधी साधी मोटारसायकलही गावात यायची नाही आणि आज चक्क कार पाहून अनेक लोकं  कारभोवती/ शाळेजवळ जमा झाली. मी गाडीतून उतरले आणि स्तब्ध उभी राहिली. डोळ्यातून पाणी आलं ! अनेक खडतर प्रवास पार करून नोकरी मिळाली आणि त्यात एवढं अवघड क्षेत्रातील गाव ! नक्कीच हा नोकरीचा पहिला आणि शेवटचा दिवस आहे असे ठरवून शाळेत प्रवेश केला. समोर जीर्ण झालेली ती शाळेची कौलारू इमारत,  फुटलेल्या कौलामधून वाऱ्याबरोबर डोकावणारा कचरा आणि माकडांचा शाळेवरचा दररोजचा हैदोस. कित्येक वर्षांपासून ऊन वारा पाऊस झेलत दम घेत जगत आजारी पडलेली ती इमारत. शाळेचा भकास परिसर पाहून मन खिन्न व उदासवाणे झाले. शाळेची अशी दुरावस्था असण्याचं कारण लोकांची शिक्षणाविषयीची अनास्था आणि कदाचित त्याकाळी एवढ्या दूरवरच्या गावात असलेल्या शाळांकडे प्रशासनाचे लक्ष नसावे. 
                 मी डी.एड. केले आहे व त्याचा समाजाला उपयोग व्हावा,  मिळवलेल्या ज्ञानाचा समाजाला फायदा व्हावा,  माझ्या हातून मुलांचे भविष्य घडावे असे मनोमन वाटायचे मात्र कुटुंबात नोकरीची फारशी आवड नसल्याने नोकरीची हातात आलेली संधी जाते की काय असं मनोमन वाटत होते. मात्र माझी इच्छा, आवड माझे पती सतीश यांना कळले होते म्हणून त्यांनी मला भक्कम साथ दिली आणि हजर व्हायला कोल्हीत घेऊन आले. पण माझ्या पाचवीला पुंजलेला संघर्ष पुन्हा येथे आला आणि वर्धा जिल्ह्याच्या टोकावरचं चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगतचे साडेतीनशेच्या जवळपास लोकसंख्येचे कोल्ही हे गाव मिळाले. नोकरीसाठी घरून येणे-जाणे करणे शक्य नव्हते व विकासापासून कोसो दूर असलेल्या या कोल्ही गावात राहायला घर मिळणे व निवृत्त कर्मचारी असलेली सासू सासरे आणि त्यांचा लाडका एकुलता एक मुलगा सतीश कोल्हीत राहणे हे सर्व अशक्य होते! पण जवळच असलेल्या शेकापूर गावात आपण खोली किरायाने घेऊ असे ठरले. 
               खोली मिळाली! बिलकुल शाळेसारखीच कौलारू. सर्व सोयींनी सुसज्ज घरात राहिलेले स्वतःचा बांधकाम व्यवसाय असलेले माझे पती सतीश मुलगी नांदायला जशी जाते तसे सर्व सोडून समाजाप्रती असलेले ऋण फेडण्यासाठी तयार झाले आणि येथून सुरू झाली माझ्या शैक्षणिक पर्वाची सुरुवात....
               शाळेत शिक्षण सेवक म्हणून सुरुवात केली. सुरुवातीला अनंत अडचणी आल्या गावातील लोकांमध्ये शिक्षणाप्रती असलेली प्रचंड अनास्था,  गावाला लागून अडीच कि.मी.वर असलेली वस्ती म्हणजे पारधी बेडा. त्यावेळी मला मु.अ.म्हणून माझ्या सारखेच शिक्षण सेवक असलेले नाईक सर होते. गावातील मुले शाळेत यायची पण पारधी बेड्यावरील मुले शाळेत यायला कंटाळा करायची आम्ही दोन्ही शिक्षक नवीन असल्याने मुलांना पारधी वस्तीवर बोलवायला जाणे त्यांचे  अस्वच्छ राहणे, बोलणे खूपच वेगळे वाटायचे. तसेच त्या लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आम्ही शिक्षक सतत धडपडत असायचो. पारधी वस्तीवर जाणारा रस्ता जंगलाचा व गावापासून वस्ती दूर असल्याने मुलांना पालक पायी चालत शाळेत घेऊन यायचे. मग मुलं आली नाही की आम्हाला आणायला जावे लागायचे. शाळेत आलेली घाणेरडी कपडे घातलेली अस्वच्छ मुले पाहिली की पालकांविषयी मनामध्ये घृणा तयार व्हायची, पण समाजाला बदलण्यासाठी संयम आणि सहनशीलता खूप महत्त्वाची असते म्हणून मी आणि माझे सहकारी मुलांना हातपाय स्वच्छ धुवायला लावायचे, त्यांच्या केसांना तेल लावून विंचरुन मला द्यावे लागायचे, त्यांची तयारी करून देणे हे माझे नित्याचेच काम झाले होते.
               मुलांना शाळेविषयी आता आवड निर्माण होत होती. मात्र पावसाळ्यात वस्तीवरून येणारा रस्ता हा शेतातून असल्याने काही दिवस रस्ता बंदच असायचा त्यामुळे या मुलांच्या शिक्षणात नेहमीच असंख्य अडचणी असायच्या. अठराविश्वे दारिद्र्य, नशिबी असलेली गरीबी, शिकार करून जगणे, दारू बनविणे, दारू विकणे आणि दिवसभर नुसते दारू पिऊन राहणे. मग ती बाई असो, माणूस असो की माझे विद्यार्थी असो. गलिच्छ राहणीमान अशा वातावरणात ही मुले शिक्षणाच्या प्रवाहातून कोसो दूर फेकली जात आहेत. पारधी लोकांच्या जीवनपद्धतीमुळे त्यांच्या मुलांचे भवितव्य धोक्यातच आहे असं मला नेहमी वाटायचे. तसं पाहिलं तर कोल्ही गाव अगदी छोटंसं. नोकरीची सुरवात केली तेव्हा शिक्षिका म्हणून काहीच अस्तित्त्व नव्हते शाळेविषयी पालकांनाही काही घेणे देणे नव्हते. पण याचे मी कधीच वाईट वाटून घेतले नाही. मात्र एकच ध्येय मनाशी ठरवले की या गावात आणि या पारधी वस्तीत शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवायची जेणेकरून शहरी भागातील पालकांप्रमाणे या गावातील प्रत्येक पालकांच्या मनात आपल्या मुलांना खूप शिकवायचे आणि मोठे करायचे अशी महत्त्वाकांक्षा निर्माण झाली पाहिजे. 
            हळूहळू सुरवातीला येणाऱ्या अनेक अडचणी माझ्या ध्येयापुढे अदृश्य व्हायला लागल्या. मुलं घडू लागली.वर्ग चार,  खोली एक,  त्यामुळे मला प्रत्येक मुलाला जाणून घेण्याची त्यांच्या समस्या शोधून समस्या निराकरणाची संधी सहज व सतत मिळत गेली. त्यातून जे निष्पन्न झाले ते म्हणजे पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित व प्रेरित झालेले आमचे हुशार विद्यार्थी. शाळा जीर्ण इमारतीत भरत होती,  सभोवताल खोल नाला, पडीक झाडाझुडपांची जमीन अशा वेळी वरिष्ठ अधिकारी शाळा भेटीला आले व नवीन इमारत बांधकाम होईपर्यत आपण जुन्या इमारतीत शाळा भरावयची नाही असे सांगून गेले, आणि आमची शाळा सुरू झाली एका मोठ्या सावलीदार हवेशीर लिंबाच्या झाडाखाली.या काळात पालकांशी संपर्क वाढल्याने पालक गावातील लोकं,  शाळेतील कामाला मदत करू लागली या निमित्ताने शाळा परिसर स्वच्छ झाला, शाळेतील शिक्षकांवर लोकांचा विश्वास वाढू लागला. विद्यार्थी व पालक यांना ज्ञानाच्या उद्यानात रमते करण्यासाठी  प्रथम त्यांना शाळेविषयी आकर्षण निर्माण करणे जरुरी होते म्हणून नवीन इमारतीच्या ओसाड परिसरात बाग निर्मितीचे कार्य आम्ही हाती घेतले.
                 मुलांना वर्गात शिकण्यापेक्षा बाहेरच्या वातावरणात शिकायला आवडत असते म्हणून प्रथम आम्ही शाळेला सौंदर्यीकरण म्हणून भाग बनवली होती मग नंतर मला वाटलं की या बागेलाच आपण शाळा बनवूया. शाळेला कुंपण नसल्यामुळे गुरं- ढोरं यांच्या त्रासामुळे बाग तयार होईल असं वाटत नव्हतं. गावकऱ्यांनाही बागेविषयी विशेष स्वारस्य,  महत्त्वही नव्हते यामुळे वृक्षारोपणाचे दोन प्रयत्न अयशस्वी झाले तरी आम्ही तिसरा प्रयत्न केलाच! पुन्हा पूर्ण रोपे लावली लॉन लावले मात्र या प्रयत्नात गावकऱ्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केले कोणी खोदकाम केले, कोणी रोपे दिली, प्रत्येकाने जमेल तसे सहकार्य केले. आमच्या शाळेत तयार होत असलेली बाग म्हणजे लोकांसाठी एक प्रकारचे उद्दिष्ट बनले होते. कोणीही आपले गुरेढोरे शाळेच्या परिसरात येऊ देत नसत, सुट्टीच्या काळातही गावकरी बागेची काळजी घेऊ लागले, त्यामुळे कुंपन नसतानाही ही बाग फुलत चालली होती. सर्व काही मनासारखे होत होते पण पारधी वस्तीच्या मुलांची चिंता नेहमी सतावत राहायची. 
               मुले शाळेला न येण्याचे कारण म्हणजे येण्यासाठी कसलाही मार्ग नव्हता. बिचारी मुलं चिखलातून वाट काढत शाळेत यायची पावसाळ्यात बड्यावर जायला फार कसरत करावी लागायची या मुलांना शाळा जवळ करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला त्यासाठी आम्ही शिक्षकांनी आश्रम शाळेविषयी माहिती घेतली. पारधी वस्ती वरील लोकांना समजावून सांगून मुलांच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी त्यांना आश्रमशाळेतच पाठविण्याचा पर्याय उत्तम आहे हे पटवून दिले. पालकांनाही पटले! शैक्षणिक वातावरणापासून दूर राहत असलेल्या मुलांना आश्रम शाळेत प्रवेश मिळवून दिला. आता ही मुलं या बेड्याच्या वातावरणातून निघून सततच्या शैक्षणिक वातावरणात रमत होती. त्यांच्याही एका नवीन आयुष्याची सुरुवात येथे झाली होती. दरवर्षी नवीन विद्यार्थी आला की त्या पालकाला भेटून त्याची सोय आश्रमशाळेत लावायची असं सतत करायचो.  आता मुले वस्तीवरून दूर गेल्याने त्यांच्यात अनेक बदल झालेले आहेत. सद्यस्थितीत ६  ते १४  वयोगटातील एकही मूल या बेड्यावर या पालकांमध्ये दिसत नाही. 
             त्यामुळे मुलांच्या राहणीमानात खूप बदल झालेला आहे. अजूनही अधूनमधून या पालकांच्या भेटी मी घेत असते. त्यांच्यात शिक्षणामुळे होत असलेला बदल पाहून आत्मिक समाधान वाटते. 
अनेक दिवसांपासून सुरू असलेले कार्य निरंतर चालू होते. आता सर्व विसरून फक्त माझी मुलंच माझ्या डोळ्यासमोर रहायची. बागेमुळे शाळेला आलेले सौंदर्य बघून विद्यार्थी, पालक व गावकऱ्यांनाही आनंद वाटला. आता बागेमुळे मुलांनाही शाळा हवीहवीशी वाटू लागली होती. विद्यार्थ्यांना अध्ययनात येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणी व समस्यांना दूर करण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीचा वेग वाढावा म्हणून विविध प्रयत्नातून विविध उपक्रम निर्मिती मी करू लागले , त्यामुळे विद्यार्थ्यांची अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ व ज्ञान दृढ होऊ लागले. तसेच शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने व गुणवत्ता विकासासाठी मी विविध उपक्रम व ज्ञाननिर्मितीसाठी  खेळातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी कष्टातून प्रयत्न केले.
           यामध्ये नाईक सर,  सुकळकर सर, शेंडे सर यांचे नेहमी सहकार्य  मिळत गेले. बाग चांगलीच फुलली. यात अनेक उपक्रम आम्ही राबवतो. यातून अनेक मुलांना खूप फायदा होत गेला. अनेक विद्यार्थी फक्त चार भिंतीच्या आतच न राहता त्यांना जसे वाटेल तसे परिसरात लॉनवर, हवेशीर, मजेशीर आनंदात शिकू लागले. या काळात पालकांचा सतत सहभाग घेतल्याने शाळेविषयी त्यांची तळमळ अधिकच वाढली होती.हे सगळं चालू असताना  सन 2013-14 च्या दरम्यान DIECPD वर्धा येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. किरण धांडे मॅडम यांना आमच्या शाळेविषयी विषय तज्ञ यांनी माहिती दिली होती, त्याच प्रभावाने धांडे मॅडम शाळा भेटीसाठी आमच्या शाळेत आल्या. शाळेतील रमणीय बाग, बालस्नेही व आल्हाददायक वातावरण त्यांच्या मनाला खूपच भावले. सहसा आमच्या गावात चार चाकी गाडी येत नाही पण अशी एखादी गाडी आलीच तर ती साहेबांचीच असते हे सर्वांना ठाऊक होते, म्हणून शाळेला भेट देण्यास आलेले अधिकारी, कौतुक पहात असलेली आमची शाळा समिती, अगदीच चुणचुणीत बोलकी हुशार मुले बघून आणि शाळेतील उत्साही वातावरण बघून सर्व जण भारावून गेले. DIECPD ने आमच्या शाळेची दखल घेतली आणि आमची शाळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरू  लागली. 
            या भेटीनंतर डॉ.धांडे मॅडम यांनी दिलेली कौतुकाची थाप खूपच जबाबदारी वाढवून गेली. संपूर्ण राज्यात डिजिटल शिक्षणाचे वारे सुरू असताना बजाज फायनान्स वर्धा तर्फे आमच्या शाळेला लॅपटॉप ईलर्निंग सॉफ्टवेअर मिळाले आणि कधीही बाहेरचे जग न पाहिलेली मुलं यामाध्यमातून बाहेरचे जग कसे आहे, सौरमंडळ कसे आहे.कविता, गाणी, संस्कारी गोष्टींच्या माध्यमातून मुलं शिकू लागली.ग्रामीण भागातील मुलांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी इंटरनेट च्या साह्याने शक्य होऊ लागल्या.शाळेतील विविध उपक्रमाची दखल प्रसार माध्यमांनीही अनेकदा घेतली अशा या दुर्गम भागातील शाळेची कीर्ती ऐकून जिल्हाधिकारी आशुतोष सलील व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना जि.प.शिक्षण सभापती भेंडे सर  DIECPD चे प्राचार्य डॉ.किरण धांडे विस्तार अधिकारी देशपांडे सर यांनी शाळेला भेट दिली.दोन आय.ए.एस.अधिकारी अक्षरश: मुलांसोबत बाकावर बसून मुलं कसे शिकतात ते पहात होते.
               मुलांच्या शेजारी बसून मित्रासारख्या गप्पा त्यांनी केल्या, प्रत्येक उपक्रम समजून घेतला,  ही भेट कोल्हीतील गावकरी व शाळा या सर्वांची मने भारावून टाकणारी ठरली आणि दुसऱ्या दिवशी प्रसार माध्यमात संपूर्ण जिल्ह्यात आमची शाळा चमकली.
सगळीकडे तंत्रज्ञानाची प्रगती चालू असताना बंधू-भगिनी यात मागे राहू नये म्हणून सुट्टीच्या काळात संध्याकाळी स्वयंपाक आटोपून माझ्या भगिनी तंत्रज्ञानातील गोष्टी शिकण्यासाठी आल्या पाहिजेत या  उद्देशाने प्रशासना व्यतिरिक्त वैयक्तिक अशी तीन दिवशीय शिक्षकांची कार्यशाळा आम्ही घेतली याकामी मला नरवटे सर व ढगे सर यांची मदत मिळाली अनेक गुरुजनांना अतिशय महत्त्वाचे असे बेसिक नॉलेज या माध्यमातून तीन दिवस वैयक्तिक स्वरूपात देण्यात आले.यासाठी पंचायत समिती सभापती संजयभाऊ तपासे यांनी पंचायत समितीतील सभागृह मिळून दिले होते. यामुळे अनेकांना यातून प्रेरणा मिळाली.    
              मी वर्धेकर असल्याने गांधीजीच्या ग्रामोद्योगी शिक्षण प्रणालीचे महत्व नेहमी जाणत होते. शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळविण्याचे साधन आहे हा गैरसमज दूर करून शिक्षणाने एक सुजाण व कुशल नागरिक घडतो हे विद्यार्थी व लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी माझा सतत प्रयत्न असायचा, यासाठी मी दरवर्षी दिवाळीनिमित्त आकाशदिवे निर्मिती करायची. एकदा एका विद्यार्थ्यीनीने शाळेत बनवलेला दिवा परवानगीने घरी घेऊन गेली. तिच्या आई-वडिलांना तो खूप आवडला खूप आनंद झाला. गावात दिवाळीला आकाश दिवा लावण्याची पद्धत नव्हती मग कल्पना सुचली या व्यवसायाचा उपक्रम सुरू केला आणि यातून कच्चामाल खरेदी, जाहिरात, आकाशदिवे निर्मिती व विक्री या सर्व प्रक्रियेत प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना दिला. 
             यावेळी मी फक्त मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आकाशदिवे विक्री केली हा उपक्रम सन 2015-16 मध्ये नवोपक्रम स्पर्धेत सादर केला व या उपक्रमास राज्यस्तरावर उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. हे यश मिळाल्यानंतर विद्याप्राधिकरण येथे कृती संशोधनाच्या प्रशिक्षणाची संधी मिळाली. त्यात विद्यार्थ्यांना अध्ययनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेऊन त्यांचा पाठपुरावा करणे व समस्या निराकरण करण्याचे माझे नेहमीचेच प्रयत्न म्हणजे नेहमीच एक संशोधनच असायचे. मुल काय शिकतं याआधी ते कसं शिकतं याला मी नेहमी महत्त्व दिले आहे. प्रत्येक मुलाची क्षमता व गरज वेगवेगळी असते ती ओळखून त्यावर संस्कार करणे गरजेचे असते हे जाणून शिक्षणाला उपक्रमाची जोड दिली व यश मिळत गेले. मला असे वाटते की शिस्तीपेक्षा प्रेमाने व खेळीमेळीच्या मनोरंजक वातावरणात प्राथमिक शिक्षण व्हावे या वयातील बालकांना शिक्षकांनी त्यांचे वयाचे मित्र बनुन शिकविल्यास ते जास्त परिणामकारक ठरते. 
            माझ्या याच पद्धतीमुळे माझ्यात व मुलांमध्ये परस्पर जिव्हाळा व विश्वास आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत यश मिळवण्यासाठी मेहनत करण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण झाली आहे. कल्पनेला जेव्हा सर्जनशीलतेची जोड मिळते तेव्हा त्यातून उदयाला येणारी निर्मिती नव्या बदलांची नांदी असते अशाच नवनवीन कल्पना वापरून आम्ही शिक्षकांनी ही शाळा जिल्ह्याच्या पटलावर आणली आणि यातच २०१५- १६   च्या सत्रात आमचे माजी गशिअ व समुद्रपूरचे तालुक्याचे विस्तार अधिकारी अशोक पिट्टलवार साहेब यांनी स्टेज निर्माण करून दिला आणि "प्रेरणादायी शाळा" म्हणून शाळेच्या प्रगतीसाठी काय काय केले याविषयी शिक्षकांच्या एकदिवशीय कार्यशाळेत कोल्ही शाळेची महती मांडली यामुळे जिल्ह्यात शाळा एक प्रेरक म्हणून उभी राहिली. आणि याच काळात शाळेचे मुख्याध्यापक नाईक सर यांची बदली झाली त्यांचे ठिकाणी नावातच देव असलेले परमेश्वर नरवटे रुजू झाले तसेही सर बारा वर्षांपासून माझ्या ओळखीचे असल्याने पुढील काळात त्यांची भक्कम साथ मला लाभली. शाळेत अत्यंत आवश्यक अशी आणि अभ्यासक्रमावर आधारित साहित्याची रचना केलेली आहे, तरंग वाचनालय, विविध फलक, रंगविलेली झाडांची खोडे, शब्द चेंडू, अशा छोट्या छोट्या विविध उपक्रमातून बाग सजवली आहे. त्यामुळे विद्यार्थी खेळत खेळत नकळत अध्ययन करतात. किडे व फुलपाखरांना छळणारी मुले त्यांच्याशीच मैत्री करून, अळ्यांचे व अंड्याचे संगोपन करू लागले.परस्पर सहकार्यातून आपल्या अध्ययनातील शंका समस्या स्वतःच सोडू लागले. आता मैत्री झाली अक्षरांशी,  बागेतील या शब्दांशी, नाही वाटत बोजड अभ्यास, नक्कीच वाढतो आत्मविश्वास. त्याचप्रकारे हा उपक्रम शोध निबंध स्पर्धेसाठी नवोपक्रम म्हणून सादर करावा असे ठरले आणि राज्य स्तरावर चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला यासाठी शाळेचे मुख्याध्यापक नरवटे सर, विस्तार अधिकारी देशपांडे साहेब, वर्धा DIECPD चे प्राचार्य डॉक्टर धांडे मॅडम तसेच बागेचे संरक्षण करणारे पालक व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य मला मिळाले. त्या वेळेची जीवनातील एक अविस्मरणीय गोष्ट म्हणजे जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.नयना गुंडे मॅडम यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्व अधिकारी यांचे समक्ष विशेष "अभिनंदन पत्र" देऊन सन्मानित केले.सर्व काही अनपेक्षित असल्याने आनंदाश्रू मोकळे झाले कारण जिल्ह्याच्या टोकावरील एका छोट्याशा दुर्गम गावातील द्विशिक्षिकी शाळेत नोकरी करणारी सामान्य शिक्षिका, मात्र मा.सीईओ मॅडमने माझ्या कामाची दखल घेऊन मला दिलेली शाबासकी पुढील कार्यास आत्मविश्‍वास व प्रेरणा देणारी ठरली. चौथीपर्यंत असलेली शाळा पाचवीपर्यंत झाल्याने आणि स्वतः नवोदयची विद्यार्थिनी असल्याने नवोदय परीक्षेचे नियोजन आम्ही केले तयारीसाठी आम्ही दोघां शिक्षकांनी नियोजनबद्ध कार्य योजिले. ज्या विद्यार्थ्यांना नवोदयची खरी गरज असते असाच विद्यार्थी म्हणजे "प्रज्वल" नवोदय ला प्रवेशित झाला !  पाचवीनंतर पुढील शिक्षणासाठी तीन किलोमीटर दररोज पायी शाळेत जाणे, त्यानंतर पालकांची आर्थिक परीस्थिती यातून त्याचे भविष्य घडेल याविषयी शाश्वती नव्हती. अशातच प्रज्वलला नवोदयला प्रवेश मिळाला आणि त्याच्या जीवनाला कलाटणीच मिळाली. सोबतच सानिया नावाची विद्यार्थिनी तेवढेच यश प्राप्त केले होते पण त्या वर्षी मुलींची गुणवत्ता जास्त असल्याने नवोदयला प्रवेशित झाली नाही पण शिष्यवृत्तीत केंद्रात प्रथम येऊन घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाले. अनेक दिवसांची मेहनत पती सतीशराव यांचा त्याग आता फळास येत होता. सतीशरावांनी प्रज्वलच्या लहानपणापासूनच गरिबीची हाल-अपेष्टा भोगत असलेला तो प्रज्वलचा परिवार पाहिला होता.त्यात तो नवोदय ला प्रवेशित झाल्याने खरे आत्मिक समाधान त्यांना झाले होते. एवढा आनंद झाला होता त्यांना की या आनंदाच्या भरात त्यांनी मला एक आश्वासन दिलं की जर पुढील वर्षी पण एखादा विद्यार्थी नवोदयला प्रवेश पात्र ठरला तर अलिशान गाडी मी तुला भेट म्हणून देईल. मनात आनंद मावत नव्हता अशातच नवोदय परीक्षेचे योग्य नियोजन केले. नियोजनानुसार इयत्ता पाचवी चे गणिताचा अभ्यासक्रम दिवाळी अगोदर संपवला आणि दिवाळीनंतर नवोदय गणिताचा सराव चालू केला विद्यार्थ्यांनी दीडशेच्या जवळपास नवोदयचे सराव पेपर सोडविले. त्यात दोन विद्यार्थिनी नेहमी नव्वदच्या वर गुण मिळवायच्या. दहावी बारावीच्या निकालाची आपण जशी वाट बघतो तशीच  नवोदयच्या निकालाची वाट मी बघत होते. यंदा निकालाला खूपच उशीर झाला होता. अखेर निकाल लागला अपेक्षेप्रमाणे लागला नाही व एकच विद्यार्थिनी नवोदय प्रवेश पात्र ठरली त्याची भर म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेत समीक्षा तालुक्यात दुसरी व सुप्रिया तालुक्यात तिसरी आली. या यशाने आनंद समाधान व अभिमान वाटतो. त्यानंतर आणखी एक अत्युच्च आनंद होता तो म्हणजे सतीशराव यांनी दिलेल्या आश्वासनाचा ! नवोदय निकाल आला उशीर झाला होता जसा निकाल लागला अगदी दुसर्‍याच दिवशी दिलेला शब्द पाळत आलिशान अशी बारा लाखाची कार सतीश रावांनी मला भेट दिली.अत्यंत आनंद झाला स्वतःच्या गाडी स्वतः चालवत शाळेत जायचे असल्याने मन अगदी न्हाऊन निघाले होते.

        एनसीएफ 2007 नुसार शाळेत ज्ञानरचनावाद स्वीकारला असल्याने त्याचा प्रचंड फायदा आमच्या शाळेला झाला चित्रकलेची आवड असल्याने सगळी पेंटिंग आम्ही स्वतः केली असल्याने त्याविषयी जिव्हाळा आहे. प्रत्येक आकृती काढताना त्यातून एखादा उपक्रम किंवा कृतीयुक्त खेळ निर्माण व्हावा अशा नियोजनबद्ध आकृत्या काढल्या. त्यातून विद्यार्थी स्वयं- अध्ययनातून ज्ञाननिर्मिती करू शकतो. मुलांना काय हवं. कसं हवं त्याप्रकारे मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करते म्हणून मुले सहज शिकत आहेत एकंदर शाळेचा कोपरा न कोपरा खेळत ज्ञानरचना व निर्मिती करणारा आहे आमच्या शाळेचे विद्यार्थी पुढील शिक्षणाला बाहेरगावी जातात तेथे सर्व विद्यार्थ्यात ते अव्वल असतात. आमच्या उत्तम संस्कारात वाढलेले चांगले संस्कारी व उत्कृष्ट ज्ञानाने परिपूर्ण अशा माझ्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या पुढील शैक्षणिक जीवन प्रवासात कोणी भरभरून कौतुक करते तेव्हा मला त्यांनी शाळेत पहिलं पाऊल टाकल्यापासून मी त्यांच्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाल्याचा आनंद होतो. हा आनंद अजून उत्साह वाढवतो व बळ देतो. माझे विद्यार्थी इतर विषयांबरोबरच मुख्यत्वे गणित व इंग्रजी विषयात ज्ञानाने आत्मविश्वासाने परिपूर्ण अशी असतात त्यामुळे पुढील अभ्यासक्रमात अध्ययन करणे त्यांना सहज जमते त्यामुळे ते सहजच विशेष प्रगती करतात. गेल्या अनेक वर्षापासून विविध शाळांचे एसएमसी सदस्य, शिक्षक, दुसऱ्या जिल्ह्यातील लोकं, पदाधिकारी आमच्या शाळेला भेटी देतात व एक प्रेरणा येथून घेऊन जातात. संपूर्ण कोल्ही गाव, शिक्षक,व विद्यार्थी यांचा आदर करतात, त्यांचा विश्वास मला नेहमी सतत काही नवीन प्रयोग करण्याची प्रेरणा देत असतो. बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे शरीराला आश्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व अगाध आहे. आजही आम्ही पारधी बेड्यावर जातो तर सगळी लोकं जमा होतात, चर्चा करतात. अजूनही विकासापासून कोसो दूर असलेला हा समाज, मागच्या काही वर्षात येथील मुले शिकली व सुशिक्षित झाली. म्हणून त्यांचे राहणीमान, बोलणे, वागणे यात बराचसा बदल झालेला दिसतो. शाळेची महती खूप दूर पर्यंत गेलेली आहे, पण भौतिक सुविधेची कमतरता आहे. म्हणून शाळाभेटीत प्रगती पाहून, खूष होऊन आमदार समीर कुणावार यांनी आमची शाळा दत्तक घेतल्याने एक नवीन झळाळी शाळेला प्राप्त झालेली आहे. आमदार साहेबांच्या मदतीने अनेक सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी कोल्हीची शाळा तयार झाली.

      यावर्षी शिक्षक दिनानिमित्त वर्धा येथे एम.गिरी 90.4 रेडिओ एफ.एम. वर प्रसारित झालेल्या यशस्वी शिक्षकांच्या प्रवासावरील परिसंवाद व चर्चेत मला सहभागी होण्याची संधी मिळाली. तेव्हा बारा वर्षाच्या नोकरीच्या प्रवासातून मिळालेले यश सांगताना अर्थव्यवस्थेचा विसर पडला व यशाचा आनंद मात्र शब्दांद्वारे ओसंडून वाहत होता. आनंद साजरा करताना जेव्हा आनंदाला जिव्हाळ्याचा स्पर्श होतो, तेव्हा मनात आनंदाचे तरंग उमटतात. या वर्षी 7 ऑक्टोबरला सकाळी एक फोन आला. समोरुन बोलणारी माझी विद्यार्थिनी समीक्षा, नवोदय विद्यालयाच्या टेलिफोन बूथ वरून बोलत होती. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होती. तेव्हा माझा जन्मदिवस आठवणीत ठेवणारं माझं गोड पाखरू,शाळेत पाऊल टाकल्यापासून पाचवी पर्यंत माझ्याजवळ राहीले,  शिकले आणि आता स्वतःचे पंखांनी उडतंय! त्यामुळे मन भारावून गेले. शाळेतील चिमुकले न विसरता माझा वाढदिवस साजरा करतात, खाऊसाठीचे पैसे वाचवून पेन, रिफिल, पेन्सिल, केसाचा चिमटा, किल्प्स,फोटोफ्रेम अशा वस्तू भेट देतात तेंव्हा अशी अतिशय निर्मळ व प्रेमळ भेट स्वीकारताना अत्यानंद होतो. या गावात बारा वर्षे सेवा झाली. मी नेहमी याच शाळेत राहावे, बदली होऊ नये असे नेहमी गावकऱ्यांना, माता भगिनींना वाटते. कारण महिला मेळावा घेऊन गावातील प्रत्येक स्त्री जेव्हा शाळेत येते, रांगोळी काढते, नृत्य करते, अनेक स्पर्धेत भाग घेते तेव्हा माझे विषयी असलेल्या कामांत त्यांचा स्नेह नकळत खूप काही सांगून जातो..

              यानंतर एबीपी माझा वरील माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र या कार्यक्रमात 'डिजिटल एज्युकेशन' या विषयावरील परिसंवादात भाऊसाहेब चासकर यांचे सोबत सहभागी होण्याची संधी मिळाली. त्याच काळात जी म्हातारी आजी जीने मला खायला कधीही कमी पडू दिले नाही ती पुंजाआजी हे जग सोडून गेली आणि दुःखाचा डोंगर आमच्यावर कोसळला. माझी तब्येत सुधारली पाहिजे म्हणून स्वतःकडे न पाहता आजी माझा विचार करायची ती आज आमच्या मध्ये नव्हती. कोल्ही गावातील लोकांनी इतका सन्मान दिला की गावातील भागवत सप्ताह मध्ये घटस्थापनेचा मान मला देण्यात आला. एका शिक्षिकेला हा मान देऊन एकप्रकारे मोठी जबाबदारी गावकऱ्यांनी दिली होती आणि त्याचे फलित म्हणून की काय सन 2018 साली अध्यक्ष चषक आदर्श शाळा योजना पुरस्कार मध्ये आमची शाळा तालुक्यात प्रथम आली. इंग्रजी दैनिक टाइम्स ऑफ इंडियामध्ये आद्रा नायर यांनी माझ्या कामाची महती खूप दूरपर्यंत पोहोचवली. सन 2019 मध्ये राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारसाठी महाराष्ट्रातून अंतिम सहामध्ये निवड झाली पण दिल्लीला कुठेतरी कमी पडले आणि राष्ट्रपती पुरस्कारापासून दूर राहिले. सन 2020 साली लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्डसाठी नामांकन मिळाले पण कोरोनामुळे कार्यक्रम स्थगित झाला. कोरोना काळात गावातील मुले ऑनलाईन द्वारे चांगली शिकू लागली पण पारधी वस्तीवरील मुलांना अशी सोय नसल्याने आम्ही हप्त्यातून दोन दिवस झाडाखाली वर्ग भरू लागलो. त्याच वर्षी माझा प्रेम नावाचा विद्यार्थी नवोदयला पात्र ठरला. या काळात पारधी बेड्यावर सारखे जाणे होत असल्याने तेथील परिस्थिती आणखीनच जवळून पाहता आली. पारधी वस्तीवर दोन अनाथ मुली होत्या त्यांचे परिस्थितीविषयी फेसबुकला लिहिले तर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलभाऊ गुळघाणे यांनी लाखभर रु खर्चून त्यांना घर बांधून दिले. झोपडीत राहणाऱ्या मुली सोशल मीडियाच्या माध्यमातून परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचवली आणि मुलींना हक्काचे घर मिळाले. समाज मदत करण्यासाठी अगदी आनंदाने पुढे आला याचा आनंद वाटला. कदाचित अशा कामाच्या गौरव म्हणून शासनाने उपक्रमशील शिक्षक व अधिकारी गटात माझी निवड केली. जीवन शिक्षण नोव्हेंबर 2021 च्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर माझ्या उपक्रमाच्या फोटोची निवड करण्यात आली. शनिवार फनिवार उपक्रमातून शाळेत अनेक गायक तयार झाले. विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीचा अनुभव देण्याचा शक्य तेवढा प्रयत्न केला. विद्यार्थ्यासह माती चिखलाचा आनंद ही गोष्ट पुण्याच्या सकाळ पेपरने छापून सुद्धा आणली. जागतिक महिला दिनानिमित्त पारधी वस्तीवरील माता पालकांचा शाळेतर्फे सत्कार करून त्यांची जबाबदारी वाढविली. माझ्या या सर्व कामाबद्दल लोकमत वृत्तपत्र समूहाने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माझा मोठा सन्मान केला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचेशी संवाद साधण्याची संधी मिळाली. आमदार कुणावर यांनी अत्याधुनिक डिजिटल साधनांचा पुरवठा केल्याने मुलांना नवनवीन अनुभव देणे सोपे गेले. एक दिवस अचानक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा.रोहन घुगे सर शाळेत आले. शाळा विद्यार्थी हे सर्व पाहिल्यानंतर प्रचंड खुश झाले आणि त्यांनी स्वतःच्या फेसबुकवर भरभरून कौतुक केले. सोबतच दुसरे आयएएस विनायक महामुनी यांनी सुद्धा इंस्टाग्राम व फेसबुकच्या माध्यमातून आमच्या शाळेबद्दल खूप छान लिहिले. कोणी आयएएस अधिकारी शाळेला भेट देतात आणि तेथील शिक्षकांबद्दल स्वतःच्या सोशल मीडियावर लिहितात असं महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडले असेल. नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक शाळा परीक्षा या स्पर्धा परीक्षा तयारीमुळे मुलांच्या ज्ञानात खूप भर पडली. 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वरती आयोजित होते आणि मराठी दालनाची जबाबदारी माझ्यावर सोपविली ती सार्थ करून दाखविली याची सर्व टीव्ही माध्यमांनी दखल घेतली. त्या काळात आमदार, शिक्षणाधिकारी यांनी शाळेला भेट दिली भरभरून कौतुक केले व त्यानंतर बदल्यांची यादी प्रसिद्ध झाली आणि माझी बदली कोल्हीवरून शेकापूरला झाली व पुढील सत्रात कोल्हीच्या शिक्षकांची भेट अधुरी राहिल म्हणून जिल्हाधिकारी साहेब यांनी सुट्टीच्या काळात मला शाळा दाखवा म्हणाले आणि अर्धा दिवस त्यांनी या मुलासोबत घालवला. दोन्ही शिक्षकांचा शाळेत सत्कार केला त्यापेक्षा अजून मोठी गोष्ट काय. संवेदशील मनाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले कोल्ही गावात आले शाळा पाहिली, पारधी वस्तीवरील लोकांशी संवाद साधला व कौतुकाची थाप पाठीवर ठेवून पुढील कार्यासाठी नवीन ऊर्जा देऊन गेले. त्यानंतर चालू झाला नोकरीचा दुसरा टप्पा शेकापूर या गावी! ज्या गावात मी सुरुवातीची नऊ वर्षे राहिली त्याच गावात आता माझी अतिशय आनंदात सुरुवात झालेली आहे. भरगच्च अशा विद्यार्थ्यांनी भरलेल्या वर्ग खोल्या, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माझा फायदा कसा होईल यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. शेकापूर गावातील सर्व लोक पाठीशी उभे आहेत. नक्कीच कोल्ही सारखीच ही पण शाळा नावारुपाला येईल यात शंका नाही. ग्रामीण भागातील या मुलांच्या शिक्षणासाठी, समाजाच्या विकासासाठी मनी बाळगलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आलिशान आयुष्य सोडून माझ्या ध्येयाप्रती जागरूक असलेले माझे पती सतीश सावंत हे नेहमी माझ्या पाठीशी ठाम उभे असतात व कायम सहकार्य करतात यातून समाजा प्रती ऋण ते व्यक्त करतात.

            यानंतरही पुढील काळात माझ्या कार्यामध्ये कोणताही खंड न पडता हे कार्य असेच सदैव चालू राहील अशी हमी देते आणि निरोप घेते.
सौ. दिपाली सतीश सावंत
(सहा. अध्यापिका)

Post a Comment

1 Comments

  1. शिक्षक असावा तर दिपाली मॅडम सारखा
    खरोखर आदर्श शिक्षिका आहात आपण...

    ReplyDelete

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन