महिलांना स्वावलंबनासाठी प्रशिक्षणातून नवी दिशा, जनजागृती सेवा संस्थेच्या सदस्यांची महिला प्रशिक्षण शिबिराला भेट
बदलापूर नगरपरिषद व ॐग्रामण्ये इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल एक्सलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत महिला प्रशिक्षण शिबिराला जनजागृती सेवा संस्थेच्या सदस्यांनी भेट देऊन महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
महिला कुटुंबासाठी सातत्याने योगदान देत असून,अनेक क्षेत्रांत महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महिलांना त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान मिळणे आवश्यक असल्याचे मत जनजागृती सेवा संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार तथा समता साहित्य अकादमीचे महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप नारकर यांनी व्यक्त केले.
उमेद बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुहास सावंत यांनी डिजिटल माध्यमे व सोशल ॲप्सचा प्रभावी वापर करून महिलांनी आपला व्यवसाय अधिक व्यापक करण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षणातून मिळालेल्या कौशल्याचा व्यावसायिक उपयोग करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे आवाहन त्यांनी केले.
सोहम इको सोल्युशनच्या संस्थापिका रोहिणी शिंदे यांनी महिलांनी आपल्या इच्छेला योग्य दिशा देत नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली. प्रशिक्षणानंतर त्यातून व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण करण्याचा विचार करणे हीच प्रगतीची सुरुवात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिक्षिका राणी सचिन भंडारे, मिनाक्षी शदर वाघमारे व ज्योती सागवेकर यांनी शिवणकामातील विविध प्रकारांची माहिती दिली. रोहिणी शिंदे यांनी शिवणकामातील बारकावे व व्यवसायाच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. राजेंद्र नरसाळे यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार गुरुनाथ तिरपणकर यांनी मानले. डायरेक्टर शिवराम चव्हाण व प्रकल्प अधिकारी प्रविण कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. नगरसेवक किरण भोईर यांच्या सहकार्याने आनंद दिघे भाजी मार्केट, सहकार हॉटेलमागे, बदलापूर पश्चिम येथे हे प्रशिक्षण सुरू आहे. महिला व बालकल्याण अधीक्षक श्रीकांत निकुळे यांचे सहकार्य लाभत आहे.

0 Comments