रखडलेले जांबरुंग धरण, धरणाचे काम सुरू व्हावे यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी दिले आमदार महेंद्र थोरवेंना निवेदन






खालापुर : समाधान दिसले 

        खालापुरातील रेल्वे लाईन पट्ट्यातील नावंढे, केळवली, वांगणी, वणी, बीडखुर्द, जांबरुंग, खरवई, डोळवली आदि 15 गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची दूर होणाऱ्या प्रस्तावित जांबरुंग  धरणाचे काम 2 फेब्रुवारी 1980 पासून रखडले आहे. हे धरण न झाल्याने यातील काही गावात दरवर्षी उन्हाळी तीन महिने पाणीबाणी समस्या तीव्र आहे. शासनाने या धरणाचे काम त्वरित सुरु करावे यासाठी रेल्वे पट्ट्यातील 15 गावातील नागरिकांची मागणी आहे. जांबरुंग धरणाच्या निर्मितीने परिसरातील 181 हेक्टर जमीन सिंचनाखाली येवून या परिसरातील पाणी समस्या कायम स्वरूपी दूर होईल असा विश्वास येथील नागरिक व्यक्त करीत असताना या धरणाचे काम अनेक वर्षापासून रखडल्याने संबंधित ठेकेदाराच्या कारभाराबाबत परिसरातील नागरिक नाराजी व्यक्त करीत असून या धरणाचे काम जलद गतीने सुरू व्हावे यासाठी या परिसरातील नागरिकांनी एकत्र येत कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांना 12 मार्च रोजी निवेदन दिले आहे, तर यावेळी आमदार महेंद्र थोरवेंनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, या धरणाचे काम लवकरात लवकर कसे सुरू होईल यासाठी पाठपुरावा सुरू असून रखडलेल्या धरणाचे काम लवकरच मार्गी लागेल.

                                                                    

    1980 साली मंजूर झालेल्या या धरणासाठी  त्यावेळी 49 लाख 20 हजार रुपये खर्चाची तरदूत करण्यात आली होती, परंतु सदर योजना 42 वर्ष रखडल्याने आत्ता नव्याने तब्बल 60 कोटीच्या घरात खर्च होणे अपेक्षित आहे. लघुपाटबंधारे विभाग व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे शासनाच्या तिजोरीवर तब्बल 90 पटीने भर पडणार आहे. तसेच परिसरातील शेतजमिनी व पिण्याच्या पाण्याची समस्या अधिकच बिकट बनली आहे. या कालावधीत अनेक पक्षांच्या राजवटी आल्या, मोठ मोठी आश्वासने देण्यात आली. मात्र या रेल्वे पट्ट्यातील परिसरात पाण्याची समस्या जटिलच असून देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष उलटूनही उन्हाळ्याचे तीन महिने रखरखत्या वाळवंटा सारखे जीवन येथील रहिवाश्यांना जगावे लागत आहे. तर यापुढेही हे धरण कधी होईल हे सांगता येत नसल्याने बीडखुर्द, डोलवली या रेल्वे पट्ट्यातील काही गावे पाण्याच्या समस्येने ग्रासलेलीच राहण्याची शक्यता आहे.


धरणाचे वैशिष्ट्ये -

          2564 .71 स.घ.मीटर पाणीसाठा क्षमतेच्या 610 मी  लांबी व 28 मी उंचीच्या या जांबरुंग धरणाच्या उभारणीसाठी 49 लाख 20 हजार रुपये खर्चाची तरतूद महाराष्ट्र राज्य शासनाने 1980 साली केली. उजवा कालवा व डावा कालवा अश्या दोन  कालव्यातून जांबरुंग, उंबरवीरा, बिड्खुर्द, केळवली, वणी, खरवई, या गावांना सिंचनाचा लाभ मिळणार होता. त्यासाठी 19.69  हेक्टर वनजमिनीचे संपादन  करण्यात आले आहे. तर या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ स्तरावर होत 1990 साला पर्यंत 13 लाख 94  हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे कागदोपत्री नमूद आहे. मात्र वनखात्याची वेळोवेळी अडवणूक व शासकीय बाबूंची दिरंगाई यामुळे हे धरण तब्बल 42  वर्ष रखडल्याने परिसरात पाण्याची समस्या तीव्र झाल्याने रहिवाश्यांन मध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 


     दरम्यान सन 2009  मध्ये वन खात्याला पर्यायी वनेत्तर जमीन उस्मानाबाद [धाराशिव] जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील चिंचपूर येथे उपलब्ध करून देण्यात आल्या नंतर वन प्रस्ताव तयार करणे कामी  15 लाख 78 हजार रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. तर नव्याने या धरणासाठी निविदा काढून धरण व सिंचन यासाठी 13 कोटी 17 लाख रुपयाची शासनाने तरतूद कऋण कार्यारंभ आदेश हि द्देण्यात आले होते. मात्र लोकप्रतिनिधी - राज्य शासन तसेच सरकारी बाबूंचे दुर्लक्ष याने वन खात्याची लेखी मान्यता न झाल्याचे कारण देत अद्यापपर्यंत काम रखडले असल्याने धरण कधी होणार या चिंतेत शेतकरी डोळे लावून बसला आहे. या धरणाच्या कामाबाबत 2014  मध्ये पंचायत समितीच्या मासिक सभेत माजी सदस्य श्यामभाई साळवी, निवृत्ती पिंगळे यांनी आवाज उडवून अधिकार्यांना धारेवर धरले होते. तर ऑगस्ट 2016 मध्ये राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पर्यावरण व जलवायू मंत्रालय वन विभाग भोपाल यांना मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वन विभागाच्या अडवणुकीच्या धोरणाला व कर्जत लघुपाटबंधारे खात्याला जाब विचारण्यासाठी येथील तरुणांनी संघर्ष समिती स्थापन केली होती. मोठ मोठ्या आंदोलनाच्या बाता केल्या होत्या, मात्र त्या बाता मागील तीन वर्ष हवेतच विरल्या असून सत्तेत असणारे व सत्तेच्या बाहेर असणारे मुग गिळून गप्प बसल्याचे चित्र असून रहिवाश्यांचे मात्र पाण्यावाचून हाल सुरूच असताना या धरणाचे काम जलद गतीने सुरू व्हावे यासाठी या परिसरातील नागरिकांनी एकत्र येत कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांची 12 मार्च रोजी आमदारांच्या कार्यालयात पोसरी येथे भेट घेऊन आपल्या व्यथा मांडून निवेदन दिले आहे.



चौकट -

  जांबरुंग धरणाच्या निर्मितीचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे या धरणाचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले असून ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा नाहक त्रास या परिसरातील नागरिकांना होत असल्याने याठिकाणचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा यासाठी या धरणाचे काम जलद गतीने होणे गरजेचे असल्याने या धरणाचे काम सुरू व्हावे याकरिता आमदार महेंद्र थोरवेंना परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दिले आहे.

संजय नाना देशमुख (नवघर ग्रामस्थ)



चौकट -

     जांबरुंग धरणाच्या निर्मितीतून या परिसराला नवी संजीवनी प्राप्त होणार आहे, त्यामुळे या धरणाचे काम लवकर सुरू होणे महत्त्वाचे आहे. धरणामुळे आमच्या परिसरात नव वैभव मिळून परिसराचा कायापालट होण्यास मदत होईल.

प्रशांत खांडेकर (जांबरुंग ग्रामस्थ)

Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार