माथेरान मधील वीज समस्येकडे प्रशासन लक्ष देणार आहे काय? प्रसाद सावंत यांचे पालिकेला चौथे पत्र

 


अजय कदम 
माथेरान : १३ मे ,

                  माथेरान या पर्यटन स्थळी महावितरण कंपनी कडून भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत.त्यानंतर या वीज वाहिन्या जिर्ण झाल्याने त्या सतत नादुरुस्त होत असतात.तर दुसरीकडे पर्यटकांचा राबता असलेल्या या शहरातील विजेच्या खांबावरील पथदिवे अनेक ठिकाणी बंद अवस्थेत आहेत तर काही ठिकाणी विजेचे खांब नादुरुस्त होवून कोसळण्याच्या स्थितीत आहे.दरम्यान,पालिकेने या सर्व बाबींवर तत्काळ लक्ष द्यावे आणि तत्काळ सुधारणा कराव्यात अशी मागणी करणारे सलग चौथे पत्र दिले असून त्या पत्रावर पालिका कोणतीही कार्यवाही करताना दिसत नसल्याने माथेरान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख प्रसाद सावंत यांनी ही सर्व पत्र रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे माहितीसाठी पाठवले आहेत.
                   

   माथेरान नगरपरिषद हद्दीतील काही रहिवासी भाग आणि काही प्रेक्षणीय स्थळे आणि बंगल्याकडे जाणाऱ्या भागातील रस्त्यांवरील रोड लाईट तसेच त्या ठिकाणी असलेले विजेचे खांब तसेच केबल आणि एफआरपी बॉक्स यांची अवस्था दयनीय झालेली आहे.तसेच बरेच ठिकाणी विजेच्या खांबांवर असलेले विजेचे दिवे आणि इतर सामान नगरपालिकेकडे उपलब्ध नाही.सदर तांत्रिक त्रुटी दूर करण्यास कर्मचारी यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे नागरिक तसेच पर्यटकांकडून तक्रारीचे प्रमाण वाढले आहे.
                 तसेच माथेरानचा पर्यटन हंगाम सुरू होणार असून सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानमध्ये पर्यटन करण्यासाठी येत आहेत. शहरातील विविध भागात रात्री अपरात्री पर्यटक भ्रमंती करीत असतात.अशा वेळेस बहुतेक ठिकाणी एलईडी लाईट्स च्या फिटिंगस नगरपालिकाकडे उपल्बध नसल्याने नागरिकांना आणि पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.बहुतेक ठिकाणी जुने लाईट चे पोल जीर्ण झाले आहेत ते कधीही पडून अपघात होऊ शकतो.तर जवळपास १८  ते २०  वर्ष पूर्वीच्या भूमिगत असलेल्या केबल खराब झाल्या आहेत.

                  विजेच्या केबल या रस्त्याच्या वर आल्यामुळे तसेच विजेच्या खांबावरील वरचे एफआरपी बॉक्स तुटल्यामुळे आणि ते उघडे असल्याने पावसाळ्यात आणि इतर  वेळी विजेचा धक्का लागून अपघात होऊ शकतात.तसेच पावसाळ्यात मनुष्य किंवा प्राणी तसेच घोडा यांची जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे.कदाचित अशी दुर्घटना घडल्यास माथेरान नगरपरिषदेची नाहक बदनामी होऊ शकते अशी भीती प्रसाद सावंत यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी आणि प्रशासक यांना दिलेल्या पत्रात ही व्यक्त केली आहे.तर या सर्व बाबतीत प्रसाद सावंत यांचे माथेरान नगरपरिषदेला सलग चौथे पत्र आहे,त्या पत्रावर माथेरान नगरपरिषद कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने सावंत यांनी चौथे स्मरण पत्र रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे माहिती साठी पाठवले आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर