गुरुनाथ साठीलकर खोपोली : १९ मे
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्या मार्गर्शनाखाली खालापूर, कर्जत आणि माथेरान येथील प्रशिक्षित आपदा मित्र आणि सखी यांना कर्जतचे प्रांताधिकारी अजित नेराळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. या प्रशिक्षणार्थीना आगामी काळात आपत्ती व्यवस्थापन आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत कार्य करताना स्वतःची ओळख असावी या दृष्टिकोनातून ओळखपत्रही प्रदान करण्यात आले.
कर्जत प्रांताधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या या विशेष कार्यक्रमात प्रांताधिकारी अजित नेराळे यांनी आपला मित्र आणि सखी यांच्या सोबत चर्चा करून संवाद साधला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करताना येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक असलेल्या संसाधनांच्या संदर्भात सविस्तर आढावा घेतला. मागील काळात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनासोबत स्थानिकांचा मदत करण्यात असलेला सहभाग हा उल्लेखनीय असतो असे प्रतिपादन केले.
आपदा मित्र आणि सखी या माध्यमातून मिळालेले प्रशिक्षण भविष्यकाळात मदतकार्य करताना अत्यंत उपयुक्त ठरेल असा आशावाद व्यक्त करताना कर्जत खालापूर आणि माथेरान येथील आपदा मित्र हे संपूर्ण संसाधनासह सर्वतोपरी सज्ज राहतील अशी तरतूद केली जाईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी, कर्जत तालुक्याचे तहसीलदार डॉ. शितल रसाळ, खालापूर तालुक्याचे नायब तहसीलदार सुधाकर राठोड आणि महसूल यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते.
गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, हनीफ कर्जिकर, अमोल कदम, दिनेश सुतार, पंकज बागुल, सुमित गुरव, वर्षा मोरे,भक्ती साठेलकर अश्या जेष्ठ आणि युवा सदस्यांसह खालापूर, कर्जत आणि माथेरान मधील आपदा मित्र आणि सखी यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
0 Comments