खालापूर तालुक्यात इरसाल ठाकूरवाडीवर दरड कोसळली; दरडीखाली ५० ते ६० हून अधिक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे

 


खालापूर तालुक्यात इरसाल ठाकूरवाडीवर दरड कोसळली; दरडीखाली ५० ते ६० हून अधिक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे 


हनुमंत मोरे 
खोपोली / वावोशी : २० जुलै,

               खालापूर तालुक्यातील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाकूरवाडीवर काल रात्री मोठी दरड कोसळली असल्याची घटना घडली आहे.कोसळलेल्या दरडीखाली या वाडीतील ५० ते ६० हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळताच रात्रीच्या अंधारात तहसीलदार आयुब तांबोळी व त्यांचे सहकारी कर्मचारी, खालापूर पोलिस यंत्रणा, अपघातग्रस्त टिमचे सर्व सहकारी मित्र तसेच अनेक स्वयंसेवक जीवाची पर्वा न करता डोंगरावरील अवघड वाटेने एकमेकांना सहकार्य करीत मदतीसाठीच्या साहित्याचे ओझे घेऊन इरसाल वाडीच्या दिशेने मार्गक्रमण करीत होते.

              या सर्वांना अपघातग्रस्त टीमच्या सहकारी भक्ती साठेलकर मार्गदर्शन करीत होत्या.भक्ती व तिचे वडील गुरूनाथ साठेलकर हे सर्वप्रथम तेथे पोहचून मदतीचा प्रयत्न करीत होते.तेथे लागणाऱ्या गोष्टींची माहिती भक्ती प्रत्येकाला देत तेथे कसे पोहचायचे ते सांगताना दिसत होती.शासकीय यंत्रणेचे बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.या दुर्घटनेने माळीण दरड दुर्घटनेच्या भयंकर आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत.


             चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात इरसाल ही ठाकूर समाजाची आदिवासी वाडी असून दरड येथील रहिवासी घरांवर कोसळली आहे.या आदिवासी वाडीत ठाकूर समाजाची अंदाजे ४० घरे असली तरी लोकवस्ती जास्त होती.यापैकी ९० टक्के घरांवर दरड कोसळली असल्याने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची शक्याता नाकारता येत नाही.यातील काही लोकांना वाचविण्यात बचाव कार्यातील लोकांना यश मिळाले.
         

  तरी या दरडीखाली आणखीन ५० हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तविली जात आहे.बचाव कार्यातील पथकाला एका महिलेसह दोन लहान मुलांना वाचविण्यात आतापर्यंत यश मिळाले असल्याचे समजते.कोसळलेल्या दरडीतून अजूनही माती पडत असल्याने रात्रीच्या अंधारात बचावकार्य करणाऱ्यांनाही धोकाच निर्माण झाला होता मात्र आता बचावकार्य जोमाने सुरू झाले असून लवकरच या दरडीखाली अडकलेल्या लोकांना मदत केली जाईल

Post a Comment

0 Comments

विकास कामाच्या जोरावर महेश बालदि पुन्हा आमदार होणार मा.सरपंच माजगांव- गोपीनाथ जाधव