पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण करणा-यांवर कडक कारवाई करा!
व्हॉईस ऑफ मिडीया रायगड जिल्हा कार्यकारिणीची राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी
दीपक जगताप
खालापूर : ११ ऑगस्ट,
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप दामोदर महाजन यांना स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली होती, त्यानंतर गुरूवार, दि. 10 ऑगस्ट रोजी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार संदीप महाजन यांना भर चौकात जबर मारहाण केली आहे. या घटनेचा व्हॉईस ऑफ मिडीया खालापूर तालुका व रायगड जिल्हा कार्यकारिणीने तीव्र शब्दांत निषेध करीत धमकी देणारे आमदार आणि मारहाण करणा-यांवर कडक कारवाई करण्याची मागणी महामहिम राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाचोरा येथील पत्रकार संदीप दामोदर महाजन यांनी केलेल्या वृत्त विश्लेषणानंतर त्यांना धमकी देवून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या गुंडांनी पत्रकार संदीप महाजन यांच्यावर गुरूवारी जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आपणास आणि आपल्या कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याची तक्रार त्यांनी पोलिस ठाण्यात केली आहे. पत्रकार संदीप महाजन यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक असून, त्यांच्या वडीलांना आणि आईस शिवीगाळही केली आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या हस्तकांनी केलेल्या या हल्ल्याचा व्हॉईस ऑफ मिडीया खालापूर तालुका व रायगड जिल्हा कार्यकारिणीने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी, हल्ल्याला फूस देणारे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या हस्तकांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कडक कारवाई करावी, अशी मागणी व्हॉईस ऑफ मिडीया खालापूर तालुका व रायगड जिल्हा कार्यकारिणीने महामहिम राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
व्हॉईस ऑफ मिडीया खोपोली शहर, खालापूर तालुका व रायगड जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिका-यांनी आज खालापूर निवासी नायब तहसिलदार सुधाकर राठौड यांना महामहिम राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या नावाने निवेदन दिले. व्हॉईस ऑफ मिडीया राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय संघटक खलील सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली आज खालापूर तहसिलदार यांना व्हॉईस ऑफ मिडीया खोपोली शहर, खालापूर तालुका व रायगड जिल्हा कार्यकारिणीकडून निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर माने, खालापूर तालुकाध्यक्ष दिपक जगताप, महिला तालुकाध्यक्ष किशोरीताई चेऊलकर, खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंखे, साप्ताहीक पत्री सरकारचे संपादक सचिन यादव, साप्ताहीक महाराष्ट्राची भूमी संपादक रविंद्र जाधव आदी उपस्थित होते.
0 Comments