गणेशोत्सवाच्या पार्श्ववभूमीवर बाजारपेठेत ढोलकीचा आवाज लागला घुमू

 गणेशोत्सवाच्या पार्श्ववभूमीवर बाजारपेठेत ढोलकीचा आवाज लागला घुमू



संजय कदम 
पनवेल : २२ ऑगस्ट,  

         आता गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. गणरायाच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. गणेशोत्सवात आरती, भजनाला लागणारी ढोलकी बाजारात दाखल झाली आहे. ठिकठिकाणी ढोलकी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे बाजारात ढोलकीचा नाद घुमू लागला आहे.
       ढोलकी तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने यंदा ढोलकीची किंमत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गणरायाचे आगमन १९ सप्टेंबरपासून घरोघरी होणार आहे. पनवेल परिसरात हजारांपेक्षा अधिक ठिकाणी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. काही ठिकाणी पाच दिवसांचे, दहा दिवसांचे व २१ दिवस गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पनवेलच्या बाजारात गेल्या चार दिवसांपासून ढोलकी विक्रेत्यांनी आपली दुकाने ठिकठिकाणी थाटली आहेत. 
             मुंबई, ठाणेसह राजस्थान येथून सहकुटुंब ढोलकी विक्रेते दाखल झाले आहेत. लहान ढोलक्यांपासून मोठ्या आकाराच्या ढोलक्या तसेच जंबे तयार करण्यापासून त्या विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. पुठ्यांसह फणस, आंबा, शिसव आदी लाकडांपासून तयार केलेल्या ढोलक्या बाजारात उपलब्ध झाल्याचे पहावयास मिळत आहे. वेगवेगळ्या आकाराच्या ढोलक्या ३०० रुपयांपासून अडीच हजारांपर्यंत बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. वाढत्या महागाईमुळे ढोलकी तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमत १० ते २० टक्क्यांनी वाढली आहे. 
             त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेने लाकडाच्या ढोलकीच्या किमतीमध्ये शंभर रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत, तर पुठ्यांच्या ढोलकीच्या किमतीमध्ये ५० ते १०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा ढोलकीच्या किंमतीत २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यात वेगवेगळ्या आकाराचे जंबे १ हजार ९०० ते २ हजार ५०० रुपये किंमत असून, लहान आकाराची लाकडी ढोलकी ३०० रुपयांपासून २ हजार ३५० रुपये आहे. तसेच पुठ्ठ्यांची ढोलकी ४५० रुपयांपासून विक्रीला ठेवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अलिबागमध्ये ढोलकी विक्रेते दाखल झाले आहे.
              ढोलकी तयार करण्याची लगबग सुरु झाली आहे. लाकडाला पॉलीश करण्यापासून रंगकाम करणे, चामडे लावणे, दोरीने ढोलकी योग्य पद्धतीने बांधणे अशा अनेक प्रकारची कामे करण्यासाठी तब्बल दीड तास लागतो. मात्र, जंबे तयार करण्यासाठी तीन तास लागत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

एक्झॉनमोबिल कंपनी कडून विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप