अंकित साखरे यांच्या दहीहंडीला मराठी कलाकारांची फौज, गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांच्या बक्षिसाची लयलूट
समाधान दिसले ( पाताळगंगा न्यूज )
खालापूर : १ सप्टेंबर,
रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकित साखरे यांच्या पुढाकारातून पालीफाटा येथे दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटानंतर होणाऱ्या दहीहंडीची जय्यत तयारी करण्यात आली असून अनेक चित्रपट कलाकारांच्या उपस्थितीत होणाऱ्या दहीहंडी सोहळ्यात लाखो रुपयांची लयलूट होणार आहे.
रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकित साखरे गेली काही वर्ष पाली फाट्यावर दहीहंडी उत्सव साजरा करतात. या उत्सवानेच अंकित साखरे यांना राजकारणात ओळख निर्माण करून दिली आहे. कोरोनाच्या काळात बंद असलेला दहीहंडी सोहळा यंदा मात्र, दणक्यात साजरा केला जाणार असल्याची माहिती अंकित साखरे यांनी पाताळगंगा न्यूज वेब पोर्टल शी बोलताना दिली.
तर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे या उत्सवाला उपस्थित राहणार असून त्यांचे मोठ्या जल्लोषात वेगळ्या पद्धतीने स्वागत केले जाणार आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील येसूबाई अर्थात अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे, मराठी बिग बॉस फेम सोनाली पाटील आणि पाटलांचा बैलगाडा फेम गायिका राधिका खुडे यांच्या उपस्थितीने दहीहंडी उत्सवातील रंगत वाढणार आहे.
दहीहंडी उत्सवात पुरुष गोविंदा पथकांना सलामीच्या पाच थरांसाठी ११ हजार रुपये तर महिलांच्या पाच थरांसाठी १५ हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. १ लाख ११ हजार १११ रुपयांची हंडी फोडण्याची संधी गोविंदा पथकांना अंकित साखरे यांनी उपलब्ध करून दिली असून बाळगोपाळ, गोविंदा पथक आणि तालुक्यातील गोविंदा प्रेमींना यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अंकित साखरे यांनी केले आहे.
0 Comments