२३ एप्रिल रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन
संतोषी म्हात्रे खोपोली : २१ एप्रिल
आपल्या देशात दर दोन सेकंदामागे एकाला रक्तपुरवठ्याची गरज भासते. आपल्यातील तीन जणांपैकी दोघांना आयुष्यात एकदा तरी रक्ताची आवश्यकता निर्माण होते. कारण विज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी मानवी रक्ताला अजूनही पर्याय मिळालेला नाही. म्हणूनच रक्तदानाचा अर्थ जीवनदान असा होतो. आपल्या देशाच्या लोकसंख्येपैकी ६० टक्के रक्तदान करण्यासाठी सक्षम असतात. पण वर्षाकाठी यातले एक टक्का इतकेच रक्तदानासाठी पुढे येतात. त्यामुळे आपल्या देशाला दरवर्षी सुमारे ३० लाख युनिट्स इतकी रक्ताची कमतरता भासते. याच कारणामुळे रक्तदान हा आपल्या कर्तव्याचा भाग ठरतो.
याची जाणीव ठेवून गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ‘श्री अनिरूद्ध आदेश पथक’, ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर’, ‘अनिरूद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’, ‘अनिरूद्ध समर्पण पथक’ या संस्था रक्तदान शिबिरांचे आयोजन करीत आहे. डॉ. अनिरूद्ध जोशी, एम. डी. मेडिसिन (सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू) यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने स्थापन झालेल्या या संस्थांनी १९९९ सालापासून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून आत्तापर्यंत १.६५ लाख युनिट इतके रक्त संकलित केले आहे. या संस्थांमार्फत यावर्षीही मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आणि गोवा, गुजरात, कर्नाटक व मध्यप्रदेशात मिळून तब्बल ८२ ठिकाणी एकाच वेळी हे महारक्तदान शिबिर पार पडेल. रविवार दिनांक २३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराची व्याप्ती फार मोठी असेल. मुंबईतूनच सुमारे आठ हजार युनिट इतके रक्तसंकलन केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जातो. या रक्तदान शिबिराचा लाभ जवळपास शंभर रक्तपेढ्या (सरकारी व खाजगी) घेणार आहेत.
या आधी मुंबईत २०१९ साली या संस्थांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकाच दिवशी मुंबईत सुमारे ८,९७३ युनिट इतके, तर महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये मिळून १५,९३७ युनिट इतके रक्तसंकलन करण्यात यश मिळविले होते. हा अनुभव लक्षात घेता २३ एप्रिल रोजीच्या महारक्तदान शिबिरालाही प्रचंड प्रतिसाद मिळेल. त्याची पूर्वतयारी या संस्थांच्या स्वयंसेवकांनी केलेली आहे अशी माहिती सुनिलसिंह मंत्री मुख्य कार्यकारी अधिकारी (अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट)यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
0 Comments