जयवंत माडपे खोपोली : २५ जून,
नगरपालिका हद्दीतील लव्हेज गावात मोठ्या प्रमाणात भेडसावणाऱ्या अपुरा पाणीपुरवठा त्याचप्रमाणे मंजूर असलेला डीपी रस्ता तातडीने कार्यान्वित करावा या व इतर मागण्यांसाठी ग्रामस्थांतर्फे आमदार महेंद्र थोरवे यांना रविवारी निवेदन देण्यात आले.आमदार महेंद्र थोरवे रविवारी विविध कार्यक्रमानिमित्त खोपोली दौऱ्यावर असताना लव्हेज ग्रामस्थांच्या विनंतीला मान देत विविध समस्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी रविवारी लव्हेज शाळा क्रमांक ८ . येथे आयोजित समारंभात त्यांनी उपस्थिती दर्शवून निवेदन स्वीकारले. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांची प्रथमता लव्हेज गावाला ही भेट होती त्यामुळे येथील महिला मंडळातर्फे गुलाबताई पाटील सौ थरकूडे व इतर जेष्ठ महिलां तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. नगरपालिका स्थापन झाल्यापासून नगरपरिषद प्रशासनाने लव्हेज गावाकडे दुर्लक्ष केले असा ग्रामस्थांचा आरोप आहे. गावातील सर्वात मोठी पिण्याच्या पाण्याची समस्या असून अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत, त्यातच गावातील कुपनलिकेचे पाणी आटल्याने तर फेब्रुवारीपासून पाणी समस्याला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे.
नगरपरिषदेने २००४ साली मंजूर विकास आराखड्यातील डी.पी.रोड गेल्या वीस वर्षापासून लाल फिटीत अडकला आहे, सद्य परिस्थितीत अग्निशमन दल तसेच रुग्णवाहि केस जाण्यासाठी रस्ता नसल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास फार मोठ्या समस्याला सर्वांना सामोरे जावे लागणार आहे. तसेच मंजूर डीपी रोड साठी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप कुठलेही भरपाई देण्यात आली नसल्याने नगरपरिषद प्रशासनाने तातडीने याबाबत ठोस भूमिका घेऊन बाधित शेतकऱ्यांना जागेची भरपाई मंजूर करावी.
नगरपरिषदेच्या सर्व प्रभागात एक किंवा त्याहून अधिक गार्डन मंजूर आहेत पण लव्हेज गावात ओपन प्लॉट असतानाही अद्याप गार्डनची व्यवस्था प्रशासनाने केली नसल्याने ग्रामस्थांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नगरपरिषद प्रशासनाने या व इतर समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करावी असे निवेदन ग्रामस्थांतर्फे आमदार महेंद्र थोरवे यांना देण्यात आले आहे.थोरवे यांनी निवेदन स्वीकारून आपण तातडीने यात लक्ष घालू असा विश्वास ग्रामस्थांशी बोलताना त्यांनी दिला. यावेळी माजी नगरसेवक सदाशिव पाटील, माजी पोलीस पाटील राम पाटील, मामा चितळकर, यशवंत थरकुडे, समीर शिंदे, प्रशांत थरकुडे, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, माजी नगरसेवक अमोल जाधव, शिवसेना पदाधिकारी मंगेश मोरे गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, महीला तसेच युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अलीकडेच गावातील तरुण मंडळीने गावात असलेल्या विहिरीचा गाव सहभागातून स्वच्छता केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments