जयवंत माडपे खोपोली ५ जुलै,
कोकणच्या मातीतील शेतकरी साहित्यिक ' पाणकळा ' कार कै. र.वा.दिघे यांच्या कसदार लेखणीची तत्कालीन साहित्यिक आणि समीक्षक दखल घेत असत. त्यांच्या नवीन कादंबरीची साहित्य रसिक आतुरतेने वाट पाहत असायचे. अनेकांनी त्यांच्या साहित्यावर डॉक्टरेट मिळवली. अनेक अभ्यासकांनी, साहित्यिकांनी दिघ्यांच्या साहित्यातील विविध पैलू उलगडून दाखवल्यामुळे दिघे यांचे मराठी साहित्यातील योगदान जगासमोर आले. परंतु दुर्दैवाने र.वा.दिघे यांचे साहित्य ज्या परिसरात फुलले त्या खोपोली आणि परिसरातील नवीन पिढी दिघ्यांच्या साहित्याचा पाहिजे तसा अभ्यास करताना दिसत नाही अशी खंत पत्रकार नितीन भावे यांनी व्यक्त केली. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने येथील ब्राह्मण सभा सभागृहात दिघे यांच्या ४३ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने भावे बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जयवंत माडपे, प्रशांत गोपाळे, हनुमंत मोरे,संदीप ओव्हाळ, संतोषी म्हात्रे, कोमसाप अध्यक्षा उज्वला दिघे,कै.र.वा.दिघे यांचे सुपुत्र वामनराव दिघे, रेखा कोरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री नलिनी पाटील होत्या. उज्वला दिघे यांनी प्रास्ताविक केल्यानंतर कै. दिघे यांना कवितेतून आदरांजली वाहिली. प्रमुख पाहुणे प्रशांत गोपाळे यांनी र.वा.दिघे हे खोपोलीची ओळख असल्याचे सांगितले. तसेच खालापूर प्रेस क्लबच्या वतीने र.वा.दिघे यांच्या नावाने पुरस्कार दिला जात असल्याचा आवर्जून उल्लेख केला. डॉक्टर भाऊसाहेब नन्नवरे आणि वामनराव दिघे यांचीही याप्रसंगी भाषणे झाली. नलिनी पाटील यांनी आपले अध्यक्षीय विचार व्यक्त केले. त्यानंतर कोमसापच्या सदस्यांनी कविता वाचन केले तसेच काही सदस्यांनी आपल्या अंगातील कलागुण सादर केले. जनार्दन सताणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष नरेंद्र हर्डीकर यांनी आभार मानले. निशा दळवी यांनी पसायदान सादर केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
0 Comments