विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी व्यक्त केली नाराजी..

 पनवेल महानगरपालिकेचा नियोजन शून्य कारभार!

विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी व्यक्त केली नाराजी..



पाताळगंगा न्यूज : संजय कदम 
पनवेल : २७ सप्टेंबर,

                    कर्नाळा स्पोर्ट्स ते साईनगर ला जोडणारा कच्चा रस्ता विरोधी पक्ष नेते  प्रीतम म्हात्रे आणि स्थानिक नगरसेविका सारिका भगत यांच्या पाठपुराव्याने कॉंक्रिटीकरणाचा मंजूर झाला होता. सदर काम काल पासून सुरू करण्यात आले. काम सुरू केल्यानंतर स्थानिक नागरिकांकडून सुरू असलेल्या कामा संदर्भात योग्य माहिती मिळावी अशी मागणी जोर धरू लागली. त्यानूसार आज प्रीतम म्हात्रे यांनी नगरसेविका सारिका भगत यांच्यासोबत स्थानिक नागरिक, पनवेल महानगरपालिका अधिकारी, काम करणारे कंत्राटदार यांच्यासोबत संयुक्त कामाचा पाहणी दौरा केला.त्यावेळी त्यांना तिथे या अगोदर नागरिकांच्या टॅक्स च्या पैशातून काही वर्षांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून बांधलेले मोठे गटार तोडण्याचं काम सुरू केलं आहे हे निदर्शनास आले.
                 नवीन रस्ता रुंदीकरण होत असल्याने  जुनी गटारे तोडण्याचे काम चालू केलं आहे तसेच रस्ता १८  मीटरचा होत असून प्रत्यक्ष दोन बिल्डिंगच्या कंपाउंड मधील अंतर हे १५  मीटर आहे ही वस्तुस्थिती त्यांनी अधिकाऱ्यांना दाखवली. अशा परिस्थितीत तीन मीटर साठी नक्की कोणाचे बांधकाम तोडणार त्या संदर्भात पनवेल महानगरपालिकेने संबंधित सोसायटी किंवा प्लॉट धारकांशी पत्रव्यवहार केला आहे का? याची माहिती मागवली असता पालिका अधिकाऱ्यांना त्याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. 
           यावेळी पनवेल महानगरपालिका अधिकारी  संजय कटेकर यांना प्रीतम म्हात्रे यांनी पुढील दोन दिवसात या अगोदर केलेल्या गटाराचा कामाचा तपशील, काम सुरू करण्याच्या अगोदर योग्य ती कामाची सीमारेषा आखून नागरिकांना कामांमध्ये पारदर्शकता दाखवावी , जेणेकरून अर्धे काम पूर्ण झाल्यावर जागे अभावी काही अडचणी निर्माण झाल्यास सदरचे सुरू केलेले काम पुन्हा थांबू नये यावर अगोदरच योग्य निर्णय घेऊन कामाचे नियोजन करूनच काम सुरू होईल याची दक्षता घ्यावी असे सांगितले.

कोट
नव्याने टेंडर काढताना त्या ठिकाणी सर्वे करून काम केले जाते. नवीन कामाला आमचा विरोध नाही परंतु काही वर्षांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून बांधलेले गटार तोडून विकासाच्या नावाखाली पुन्हा नव्याने काही मीटर बाजूला नव्याने घेतले जाते. पनवेल नगरपालिका असताना भविष्याचे प्लानिंग करूनच मोठी गटारे करोडो रुपयाची टेंडर काढून बनवली गेली. आता महानगरपालिका झाल्यानंतर तीन ते चार वर्षाच्या कालावधीतच ती तोडून पुन्हा नव्याने केली जातात म्हणजे यांच्या विकासाचे मॉडल नक्कीच कुठेतरी चुकते. हा नक्की विकास कोणाचा हा प्रश्न माझ्यासहित सामान्य नागरिकांना पडला आहे:- 
प्रितम जनार्दन म्हात्रे मा.विरोधी पक्ष नेता
पनवेल महानगरपालिका

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर