शिक्षणावर बोलू काही ........ सुभाष राठोड
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
वडगांव : २९ सप्टेंबर,
आज सकाळी विवेक सावंतांना ऐकलं थोडावेळ मेंदू शांत झाला,मला तरी वाटलं आता ब्रेन स्ट्रोक येतो की काय...खूप मार्मिक आणि नेमकं बोलले ते, पहा काय बोलले 'चार बाय चार च्या मोरीमध्ये अंगणवाडी भरते,काय देतील त्या अंगणवाडी ताई मुलांना आणि आम्ही विश्वगुरू होण्याचे स्वप्न पाहतोय,देतोय काय आपण त्या अंगणवाडी ताईला कोणती सुविधा देतो की त्या संस्कार करायला कमी पडणार नाही.आमचे उदासीन धोरण याला जबाबदार आहे.
मी जे लिहितोय ते थोडे कान, मन, डोळे उघडे ठेऊन वाचा, या अशा बाबींमुळे होतंय काय की आपल्याकडे गुन्हेगारी वाढतेय आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आणि इतर सुरक्षा योजना आखाव्या लागतात आणि त्या सक्षम असाव्यात म्हणून अद्ययावत कराव्या लागतात.मग यावर होणारा खर्च मोठा असतो यात तुरुंग आले,बंदोबस्त आला आणि त्यावरच फौजफाटा आला.मग काय होते ज्या ठिकाणी गुंतवणूक करायला हवी आम्ही तिथे न करता एका वेगळ्या ठिकाणी केली जाते त्यामुळे आमची अर्थव्यवस्था एखाद्या इन्व्हर्टेड पिरॅमिड सारखी होते.एकूणच परिपाक म्हणजे दोष शिक्षण व्यवस्थेला दिले जाते.आपल्याकडे पाश्चात्य राष्ट्राच्या विकासाची व शिक्षणाची अनेक यशस्वी उदाहरणे दिली जातात...पण कधी पाहिलं का तिथल्या *अंगणवाड्या,बालवाड्या,शाळा किती स्वच्छ सुंदर आणि शिकण्यासाठी पोषक आहेत,तिथे तुरुंगाची संख्या सुद्धा नगण्य आहे.
याउलट आमच्याकडे काय होते पहा, बालवाड्या मंदिरात,अंगणवाड्या कोंडवाड्यात, शाळा इमारत असेल पण एकदम भकास कारण आमच्या शासनाला असे वाटते की यासर्वांवर होणारा खर्च वायफळ आहे. हा खर्च कधीच वायफळ नाही ही भविष्यातील राष्ट्रीय गुंतवणूक आहे मानवी मूल्यांची त्यापेक्षा हे मंदिरे,तुरुंग चांगले करत बसलेत.जर शाळा चांगल्या राहिल्या तर संस्कार ही चांगले होतील पण आम्हाला त्याची ऍलर्जी दिसते.अलीकडे शाळांचे विलीनीकरण,समायोजन,CSR दत्तकीकरण सारखे शासन निर्णय निघाले आहेत,
ज्या सुपीक डोक्यांनी हे GR काढले असतील त्यांनी एकदा आठवाव आपला गाव आणि गावातली शाळा कारण जर हीच जिप ची शाळा तिथे नसती तर ह्यांच्या बापाने यांना लावलं असत की गाई म्हशी वळायला.मग कुठल्या AC त बसून तुम्ही शाळांचे अहवाल लिहिले असते...? अनेक अंगणवाड्यांची पट संख्या सर्रास किचन ट्युशन(बाई किचन मध्ये स्वयंपाक करत करत मुलांना शिकवत असते महिना 500 रुपये प्रति विद्यार्थी) ने बळकावली आहे.मुले खाऊ साठी अंगणवाडीच्या पटावर असतात पण शिकायला दुसरीकडे खाजगी क्लास ला जातात.
अजून एक फंडा खाजगिकरणाचा पाहायला मिळतोय अलीकडे,जिल्हा परिषद शाळेच्या जवळ खाजगी शाळा असेल तर तिथल्याच कोणाच्यातरी जवळचे नातेवाईक प्ले गार्डन सुरू करतात आणि तिथे 3 ते 5 वर्षाच्या मुलांना प्रवेश देऊन त्यांच्या पालकांकडून जन्मतारखेचा दाखला घेतात व परस्पर खाजगी शाळेला सुपूर्द करतात.हे एक पट कमी होण्याचे छुपे कारण आहे.महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या शासनाला ही उपरती कधी होणार की अंगणवाड्या,बालवाड्या व सरकारी शाळांचे नुसते कागदी नव्हे तर प्रत्यक्ष सक्षमीकरण करणे आवश्यक आहे.
जर सरकारी शाळांचे विकसन झाले नाही आणि असेच दळभद्री धोरणांची अंमलबजावणी होऊ लागली तर नक्कीच गोर, गरीब,मजूर कष्टकरी जनतेच्या मुलांच्या हातून शिक्षण हिसकावून निरीक्षर बेरोजगार तयार झाल्याशिवाय राहणार नाहीत. "CSR च्या माध्यमातून शिक्षण महाग होणार आहे हे नक्की.शासनाने याचा विचार करावा".तुरुंगाची संख्या वाढवायची नसेल तर अंगणवाड्या,बालवाड्या,शाळांवर गुंतवणूक करणे हा एकमेव उपाय आहे. नाहीतर शिक्षा की बग्गी देखणे के लिये ही रह जायेगी...
रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांव मुख्याध्यापक - सुभाष राठोड, दुरध्वनी क्रमांक ( 9911858485)
0 Comments