कुंभिवली ग्राम पंचायत नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी घेतली खासदार श्रीरंग बारणे यांची भेट
पाताळगंगा न्यूज : हनुमंत मोरे
खोपोली / वावोशी : २६ नोव्हेंबर
निवडणूक कार्यक्रम संपल्यानंतर आपण कोणत्याही पक्षाचे राहत नसुन गावातील प्रत्येक भागातील विकासासाठी कार्यरत राहणे हे निवडून आलेल्या आणि निवडणूकीत पराभूत झालेल्या प्रत्येक व्यक्तिचे कर्तव्य आहे.पक्ष,जात हे भेदभाव विकासाच्या आड येत असतील तर या संकुचित विचारांना तिलांजली देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत कुंभिवली येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश गायकवाड यांनी नुकत्याच झालेल्या कुंभिवली ग्राम पंचायतीच्या निवडणूकीत विजयी झालेल्या ग्राम पंचायत सरपंच रेखा घनश्याम वीर,सदस्य परेश परशुराम गायकवाड,देवकी खंडू वीर,धनश्री विशाल म्हामुणकर आदींसह ग्रामस्थांना सोबत घेत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेतली.
आपली भेट ही कोणत्याही राजकीय उद्देशाने प्रेरित नसल्याचे स्पष्ट करीत उमेश गायकवाड यांनी असे सांगितले की,गावात निवडणूकीपूरते राजकारण ठिक आहे.अन्य वेळी राजकारण करीत राहिलो तर गावातील विकास कदापि होणार नाही.खरे म्हटले तर स्थानिक पातळीवरील राजकारणात कोणीही जिंकत नसते आणि कोणीही पराभूत होत नसते, त्यामुळे जिंकलेल्याने हवेत राहू नये तर पराभूत झालेल्या ने कमीपणा वाटण्याची गरज नाही.गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येत विकासाची गंगा खेचून आणायला हवी यातच खरा विजय माणला पाहिजे.आम्हाला राजकीय अस्तित्व निर्माण करायचे नसून लोकांच्या समस्यांची सोडवणूक करायची असल्याने यापुढे राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी निधी कसा मिळविता येईल यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वास कुंभिवली गावातील युवा नेतृत्व तथा सामाजिक कार्यकर्ते उमेश गायकवाड यांनी व्यक्त केला.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या भेटीसाठी आलेल्या कुंभिवली ग्राम पंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी आपली भेट कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नसून आम्हाला गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असल्याने ही भेट घेण्यात आलेली असून यापुढे सर्वच लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन विकासनिधी मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सरपंच रेखा घनश्याम वीर यांनी सांगितले तर सदस्य परेश परशुराम गायकवाड यांनी असे सांगितले की,निवडणूक काळात प्रत्येकाला पक्ष वाढीसाठी आणि निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे.यासाठी कोणी कोणत्याही
पक्षाचा आधार घेऊन आपले नशीब आजमावून पाहत असतो.यात कोणाच्यातरी विजय होत असतो आणि कोणीतरी पराभूत होत असतो.विजय आणि पराभव या गोष्टी पुढे जाऊन गावातील विकासासाठी अडथळ्यांच्या बणू नये यासाठी लोकांनी निवडणूका विसरून एकमेकांना सहकार्य करून गावाच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे तरच गावातील सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागणार नाही.
____ कोट----
.कुंभिवली ग्रामस्थांचे माझ्यावर वैयक्तिक स्वरूपाचे प्रेम भरपूर आहे.या प्रेमाच्या पोटी आलेल्या सर्व ग्रामस्थांचे मी मनापासून स्वागत करतो.त्यांनी माझ्याकडे व्यक्त केलेल्या भावनांचा आदर करून तेथील विकासाठी लागणाऱ्या निधी मिळवून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो.खासदार म्हणून माझे कर्तव्य समजून तेथील विकासासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
___ श्रीरंग बारणे
खासदार मावळ लोकसभा
0 Comments