सहा जणांचे प्राण वाचवण्यासाठी एक फोन कॉल कारणीभूत ठरला

सहा जणांचे प्राण वाचवण्यासाठी एक फोन कॉल कारणीभूत ठरला


देवदूतांच्या प्रयत्नांपुढे बोरघाटात आठजणांवर घात लावून बसलेली नियती झाली हतबल. दुर्दैवाने दोघांचा मृत्यू

पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे 
खोपोली : २३ मे,

               २० मे २०२४  रोजी रात्री १० : २०  वाजता खोपोलीतील सचिन बोराणा यांनी गुरूनाथ साठेलकर यांना फोन करुन सांगितले की बोरघाटात राजमाची जवळ अपघात झालाय,  गुरु जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही मेंबर्स येथे पोहोचा. अपघात खूप भीषण आहे,  कंटेनर कार वर कोसळला आहे आणि कारमध्ये  पॅसेंजर अडकले आहेत. त्याच्या बोलण्यातली अगतिकता त्या घटनेचे गांभीर्य स्पष्ट करत होती. 
              सचिनचा निरोप मिळताच गुरूनाथ साठेलकर यांनी  विजय भोसले यांना फोन करून तातडीने निघायचे ठरवले. त्याच दरम्यान 'अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीच्या' व्हाट्सअप ग्रुपवर मदतीचे आवाहान करणारा मेसेज त्यांनी दिला. त्याच सोबत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या कंट्रोल रूमला अपघाताची माहिती देऊन देवदूत यंत्रणा आणि क्रेन त्या ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था करावी असे सांगीतले.महामार्ग वाहतूक शाखेचे बोरघाट टॅपच्या सहायक पोलीस निरीक्षक योगेश भोसले यांना त्या ठिकाणी पोलिस यंत्रणा रवाना करण्याची विनंती केली. त्या दरम्यान स्वामिनी  संस्थेच्या ॲम्बुलन्स देखील तेथे रवाना केल्या. 
                   गुरूनाथ साठेलकर आणि विजय भोसले खोपोलीतून मोटरसायकल घेऊन घटनास्थळी निघाले कारण त्या ठिकाणी पोहचण्यासाठी मोटरसायकल शिवाय फास्टेस्ट पर्याय दुसरा कोणताच नव्हता. अवघ्या काहीं मिनिटात ते त्या ठिकाणी पोहचत असताना सचिन बोराणा यांचेकडून तेथील सिच्युएशन जाणून घेत त्या पद्धतीने प्लॅनिंग करणारे व्हॉईस मेसेज आपल्या सहकाऱ्यांना देत गेले. 
                आजवरचा अनुभव पाहता जुन्या मुंबई पुणे महामार्गावर राजमाची सनसेट पॉइंट जवळ असलेल्या बॅटरी हिलच्या शार्प टर्नवरील तीव्र उतारावर अपघात झाल्याची त्यांना वाटणारी शंका खरी ठरली. अपघातामुळे वाहनांची कोंडी झाली होती त्यातून वाट काढत ते स्पॉटवर पोहोचले. पुण्याहून मुंबईकडे जाणारा कंटेनर अलिबाग येथून पुण्याकडे जाणाऱ्या कारवर कोसळला होता आणि कार मध्ये पॅसेंजर अडकून पडले होते. अपघात घडता क्षणीच प्रथम त्या ठिकाणची परिस्थिती हाताळण्यासाठी पोहचलेल्या स्थानिक रहिवासी आणि इतर युवकांनी अपघातग्रस्त कारमधील जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला होता, त्यात त्यांना एका दीड वर्षाच्या बच्चूला बाहेर काढण्यात यश देखील आले होते. 
             तेवढ्यात अपघातचे टीम मेंबर्स तेथे पोहचण्यास सुरूवात झाली होती. तेथील गर्दीतून कोणीतरी अपघातवाले आलेले आहेत तुम्ही बाजूला व्हा असे आवाहन करताच पाणी दुभंगावे त्या प्रमाणे गर्दी बाजूला हटली,  विजय भोसले आणि गुरूनाथ साठेलकर यांनी त्यांचा अनुभव पणास लावण्यास सुरुवात केली. काही क्षणातच बलदंड देहयष्टी असलेला चालक जो कारच्या स्टेरिंग आणि सीट यामध्ये जबरदस्त अडकून पडला होता त्याला बाहेर काढण्यात यश आले. कारच्या समोरील डाव्या बाजूच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीची हालचाल जवळ जवळ शून्य प्रमाणात होती,  त्यामुळे पुढच्या प्लॅनिंग नुसार मागील बाजूस बसलेल्या सर्व पॅसेंजरना काढण्याकडे कॉन्सन्ट्रेट करायचे ठरले. 
                  रात्रीच्या अंधारात वाहनांच्या कोंडीतून मार्ग काढत महामार्गावरची देवदूत यंत्रणा आणि आय आर बी पेट्रोलिंगची क्रेन काही क्षणातच त्या ठिकाणी दाखल होणार होती.  त्याअनुषंगाने पुढील नियोजन आणि इतर व्यवस्था करण्याचे मार्गदर्शन विजय भोसले आणि गुरुनाथ साठेलकर यांनी त्यांच्या पाठोपाठ त्या ठिकाणी दाखल झालेल्या हनीफ कर्जीकर, महेश भोसले, खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी विकास पाटील, अमोल कदम, भक्ती साठेलकर, निलेश कुदळे, संकेत पाटील, शुभम कंगळे, पंकज बागुल, सौरभ घरत, मोहन पवार, योगेश औटी,  निखिल ढोले, ऋषिकेश विश्वकर्मा, सर्वजीत पाठक, रोहिदास गायकवाड, अंकुश मोरे, शैलेश मांडवकर, हेमंत खवळे, विशाल पवार, रुपेश पवार, अमित गायकवाड, समीर लिमये यांना करून त्यांच्याकडे जबाबदाऱ्या विभागून दिल्या. 
            देवदूत यंत्रणा येता क्षणीच त्यांच्या सोबत अपघात टीमच्या मेंबर्सनी लगोलग अत्याधुनिक संसाधनांच्या मदतीने कारच्या मागील बाजूस अडकलेल्या लहान मुलीला पत्रा कापून मोठ्या मुश्किलीने बाहेर काढल्यानंतर लोकमान्य हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्स मध्ये असलेल्या आरोग्य यंत्रणेने त्या मुलीचा ताबा घेत तिच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले. त्या क्षणापर्यंत कार मधील तीन जणांना बाहेर काढले गेले होते. त्या नंतर आढावा घेतला असता आत मध्ये अजून पाचजण असल्याचे समोर आले. 
            त्यात वयस्कर दोन महिला, एक पुरुष आणि दोन लहान मुले अक्षरशः दबली गेली होती. त्यांना बाहेर काढण्यासाठी कारवर पडलेला कंटेनर उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तोवर त्या ठिकाणी क्रेन देखील दाखल झाली होती. क्रेनच्या सहाय्याने कंटेनरची मागची बाजू लिफ्ट केल्यानंतर कार सर्वांच्या मदतीने मॅन्युअली बाहेर ओढून काढण्याचे ठरले. क्रेनने ज्या क्षणी कंटेनर उचलला त्या क्षणी तेथील सर्वांनी मिळून त्याखाली अडकलेली कार खेळण्याप्रमाणे ओढून बाजूला काढली. आता कार मधील इतरांना बाहेर काढणे म्हणजे दिव्यच होते. 
             त्या नुसार रिप्लॅनिंग केले गेले. हायड्रोलिक स्प्रेडर, कटर आणि जॅकच्या सहाय्याने कारचा पत्रा कापून, सीट वाकवून, दरवाजांचे लॉक तोडून एका मागोमाग एक असे सर्वांना बाहेर काढले. कारवर प्रचंड वजनाचा कंटेनर कोसळल्यानंतर बसलेल्या धक्क्यात चालकाच्या शेजारी बसलेला पुरुष आणि मागे उजव्या बाजूस बसलेल्या एका महिलेला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या, त्यामूळे त्यांची प्राणज्योत मालवल्याचे तेथे उपस्थित डॉक्टर्सनी जाहीर केले. जखमी ना प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी पाठवले गेले. त्यानंतर महामार्गावरचे ट्राफिक बंद करून दोन क्रेनच्या सहाय्याने पडलेल्या कंटेनर आणि कार बाजूला घेण्यात आली. इतका वेळ सुरू असलेला जीवन मृत्यूचा संघर्ष संपला होता आणि वाहतूक सुरळीत करण्यात यंत्रणांना यश आले होते. 
               या भीषण अपघातात मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या कारमधील आठ जणांपैकी देवदुतांच्या भूमिकेत त्या ठिकाणी धाव घेणाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नाने सहा जणांना वाचवण्यात यश आले. 
   सचिन बोरांना हे खोपोलीकडे येत असताना त्यांचे कार मागोमाग येणारा कंटेनर समोरून घाट माथ्यावर चढणाऱ्या कारवर कोसळल्याचे दिसताच त्यांनी दाखवलेली समयसूचकता आणि त्यानंतर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेने सर्व यंत्रणा आणि स्थानिकांच्या मदतीने राबवलेली संयुक्त बचाव मोहीम,  रात्रीच्या मिट्ट अंधारात घात लावून बसलेल्या नियतीच्या पाशातून आठ जणांपैकी सहा जणांना सोडवण्यात यशस्वी झाली होती. 
                 अपघात घडल्यानंतर सचिन बोराणा यांचा एक फोन त्यानंतर त्यानंतर तेथें मदतीला धावलेले बॅटरी हिल आणि खंडाळा गावातील स्थानिक, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची टीम मेंबर्स, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा खंडाळा - बोरघाटचे अधिकारी आणि कर्मचारी, खोपोली  पोलीस स्टेशनचे कर्मचारी, लोणावळा शहर पोलीस स्टेशनची  यंत्रणा, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान, लोकमान्य रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था, स्वामिनी संस्थेच्या ॲम्बुलन्स तसेच तेथे मदतीसाठी आलेल्या प्रत्येकाच्या गाठीला त्यांच्या योगदानातून समाधाना सोबत पुण्य देखील जमा झाले आहे. या बचाव मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येकाचे खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी आणि खोपोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांनी आभार व्यक्त केले आहेत.  
      गुरुनाथ विजया रामचंद्र साठेलकर.
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था - रायगड. 


योगेश चौधरी - 40 चालक
जानवी योगेश चौधरी - 31
दीपांशा योगेश चौधरी -9
जिगिशा योगेश चौधरी - 1.5
मितांश दत्तात्रय चौधरी- 9
भूमिका दत्तात्रय चौधरी - 16 हे सर्वजण सुदैवाने वाचले

कविता दत्तात्रेय चौधरी आणि दत्तात्रय चौधरी या  पतीपत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
 हे सर्वजण तळेगाव येथे राहणारे असून अलिबाग येथे सहलीला गेले होते आणि तेथून परतताना काळाने घात केला.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर