देशवासियांसमोर मोदींचा खोटेपणा उघडा पडलाय - ॲड. असीम सरोदे

 

देशवासियांसमोर मोदींचा खोटेपणा उघडा पडलाय -  ॲड. असीम सरोदे

सुशिक्षित मतदारांनी २०१४ मध्ये केलेली चूक सुधारावी लागेल

पिंपरी-चिंचवडमधील असंख्य वैद्यकीय व्यावसायिकांचे संजोग वाघेरेंना समर्थन


पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
पिंपरी : ५ मे,

               लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला नरेंद्र मोदी यांचा खोटेपणा समजला आहे. भाजपच्या सरकारने नवीन कायदे करून इलेक्ट्रॉल बॉण्डसारखा सर्वात मोठा राजकीय घोटाळा केला आहे. २०१४ मध्ये त्यांच्या खोट्या आश्वासनांना भुलून सुशिक्षित लोकांनी केलेली चूक या लोकसभा निवडणुकीत सुधारावी लागेल. देशासाठी आणि संविधानासाठी महाविकास आघाडीला मतदान करा, असे आवाहन निर्भय बनो अभियानाचे संयोजक तथा विधीज्ञ ॲड. असिम सरोदे यांनी केले.
            मावळ लोकसभेचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या समर्थनार्थ चिंचवडमध्ये वैद्यकीय व्यावसायिकांचा मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख ॲड‌. सचिन भोसले, महिला संघटिका सुलभा उबाळे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, आम आदमी पक्षाचे पदवीधर प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे, पिंपरी चिंचवड डॉक्टर सेलचे डॉ.‌ सुनील जगताप, डॉ. मनोज राका, मनिषा गरुड, डॉ. अर्चना वाघेरे, डॉ. दत्तात्रय कोकाटे, डॉ. अभय तांबिले, डॉ. वैशाली कुलथे, डॉ. अनिकेत अमृतकर, डॉ. सुजित पोखरकर, डॉ. प्रफुल पगारे यांच्यासह शहरातील विविध डॉक्टर संस्था व संघटना यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            ॲड‌. असीम सरोदे पुढे म्हणाले, मोदींना पराभव दिसू लागलेला आहे. म्हणून ते आता उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणत्याही मार्गाने निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करुन त्यांनी राजकारण खराब केले. भाजपमधील चांगल्या विचारांच्या लोकांना देखील ते  पुन्हा सत्तेवर नको आहेत. अनेक उमेदवार मोदींची सभा नको म्हणतात. अतिशय चुकीचे राजकारण त्यांनी केलं आहे.  महाराष्ट्रात फिरल्यानंतर जनता भाजप आणि नरेंद्र मोदी यांना कंटाळलेली आहे, हे लक्षात येते. तर फडणवीसांना त्यांनी केलेल्या राजकीय पातकासाठी जनता माफ करणार नाही. राज्यात भाजपला लोकसभेच्या खूप जागा मिळत आहेत. या निवडणुकीचे महत्त्व ओळखून सर्वांनी मावळमध्ये महाविकास आघाडीला व संजोग वाघेरे यांना मतदान करून विजयी करा. आजच्या घडीला त्यांच्यासारख्या विनम्र, संवेदनशील व्यक्तींची राजकारणात गरज आहे, असेही असीम सरोदे म्हणाले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा व‌ त्यांच्या हिताचा विचार इंडिया आघाडीने मांडला असून २५ लाखांचा कॅशलेस विम ही त्यांची घोषणा महत्वाची ठरेल, असेही ते म्हणाले.
            उमेदवार संजोग वाघेरे पाटील म्हणाले, दहा वर्षांत देशाला वेगळ्या मार्गाला घेऊन जाण्याचे काम सुरू आहे. नोक-या कमी झाल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कंत्राटीकरण वाढले. योजनांची अंमलबजावणी होत नाही. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नवीन सुधारणांसाठी आणि तुमचे प्रश्न मांडण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. कोरोना काळात महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी सांभाळली. हे डॉक्टर अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात. त्यांना साथ देण्यासाठी मशाल चिन्ह लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले.
             या बैठकीत वैद्यकीय क्षेत्रातील पदाधिकारी व‌ डॉक्टर यांनी सरकारी योजनांमधील त्रृटी व स्थानिक प्रशासनाकडून होणारी अडवणूक याबाबत समस्या मांडल्या.‌ यावरून संजोग वाघेरे पाटील यांनी लक्ष घालून त्या सोडविण्यासाठी कायम सोबत राहण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थितांना ॲड. सचिन भोसले, सूलभा उबाळे, मानव कांबळे, मारुती भापकर यांनी मनोगत व्यक्त करुन संजोग वाघेरे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
          या  बैठकीचे संयोजन आकाश वाघेरे यांनी केले‌.‌ मनीषा गरुड व अनिकेत अमृतकर यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. अर्चना वाघेरे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर