आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे- ८ मा. जगन्नाथ ओव्हाळ

 आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे- ८ मा. जगन्नाथ ओव्हाळ



पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खोपोली : १२ जून,

            जवळपास ४० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही खोपोली येथे नगरपालिका दवाखाना क्वार्टर्स ला रहात होतो. एक किरकोळ शरीरयष्टी असलेला दाढी वाला तरूण भेटायला आला.सुभाष मोरेंच्या जिवाशिवा साप्ताहिकात मी तेव्हा सदर लिहायचो.हे त्याला कळले होते. त्याने त्याचे नाव सांगितले " मी जगन्नाथ ओव्हाळ." ग्रामीण कर्मचाऱ्यांची कैफियत नाव असलेल्या साप्ताहिकासाठी तो काम करत होता. कॉम्रेड माधव मोकाशी डाव्या संघटनेच्या मुखपत्राचे संपादक होते. मी जगन्नाथ च्या सांगण्यावरून तिथे लेख, कविता देऊ लागलो. 
             माधव मोकाशी आणि त्यांच्या मिसेस अतिशय मनमिळाऊ होते. जगन्नाथ त्यांचा लाडका होता.जगन्नाथ चे वडील माधव मोकाशी यांच्या जवळचे होते.सुधागड तालुक्यातील कानसळ येथे त्यांचा जन्म झाला.जगन्नाथ गरीब कुटुंबातील होता. खोपोलीत सिध्दार्थनगर येथे ते रहात. ते खरे तर कर्जत रेल्वे स्टेशन जवळ रहात होते. जगन्नाथ, रवींद्र, गोपिनाथ हे सर्व भाऊ, कष्टाळू होते. नंतर ते सारे पत्रकारितेकडे वळले. मी त्यांच्या घरी जाऊन आलो
            स्वाभिमानी, मेहनती, प्रामाणिक जगन्नाथ जवळचा झाला.लाघवी, नम्र असल्याने सर्वांना आवडे.त्याला सामाजिक कार्याची आवड होती. तो अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, समस्या पाहून पेटून उठे. त्याचे निवारण करण्यासाठी तो पाठपुरावा करत असे. त्यासाठी तो जाहीर उपोषण ही करी. त्याने नगरपालिका असो की कोणती शासकीय संस्था, नेहमी न्याय बाजू घेतली.मी साहित्य संस्थेत होतो. त्याला यायला सांगितले. तो आला देखील. मात्र तो रमला नाही. नंतर त्याने स्वतःचे साप्ताहिक सुरू केले. तिथे मी लिहीत असे.त्यांच्या कार्यामुळे लोक त्यांना आदराने भाई ओव्हाळ म्हणून संबोधतात. 
              आम्ही पुण्यात आल्यावर माझ्या काव्यसंग्रह प्रकाशनासाठी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून आमंत्रित केले होते.माझ्यावर त्यांच्या साप्ताहिकाचा विशेषांक प्रकाशित करून मला त्यांनी सुखद धक्का दिला. हळूहळू शहरातील प्रतिष्ठीत सन्माननीय आदरार्थी म्हणून ते गणले जाऊ लागले. अनेक सन्मान, पुरस्कार त्यांना मिळाले. आत्मोन्नती व विश्वशांती साधक संस्था, पुणे यांचा समाज सेवेबद्दल संत एकनाथ पुरस्कार, युवा शक्ती नासिक चा पुरस्कार, कोकण पदवीधर शिक्षक संघटनेचा समाज भूषण पुरस्कार हे काही पुरस्कार मिळाले आहेत. 
                  सिद्धांत सेवा संस्थेचे ते अध्यक्षीय संस्थापक आहेत.खोपोली हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष आहेत. रायगड प्रेस क्लब चे सल्लागार आहेत. रायगड जिल्ह्याच्या शिल्पकार साहित्य मंडळाचे सल्लागार म्हणून ते काम पाहतात.रायगड तडाखा या साप्ताहिकाचे ते वर्तमान संपादक आहेत. त्यांना वाचन, लेखनाची आवड आहे. त्यांचा"तपस्वी "नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. प्रमुख पाहुणे म्हणून मला त्यांनी निमंत्रित केले होते. "आठवणीतील माणसे" हे त्यांचे पुस्तक नावाजले गेले आहे. संवेदनशील कवी असून ते आपल्या परखडपणा, स्पष्टवक्तेपणा यासाठी ओळखले जातात. 


Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर