कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंती निमित्त खोपोली येथे भव्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन

 कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंती निमित्त खोपोली येथे भव्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन 




पाताळगंगा न्यूज : गुरुनाथ साठेलकर  
खोपोली : २१ जुलै,

             कुस्ती महर्षी  स्व.भाऊसाहेब कुंभार  यांच्या स्मृती दिनानिमित्त  जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा 2024 चे खोपोलीत भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी भारतीय खेल प्राधिकरणाचे वरिष्ठ प्रशिक्षक तथा भारत सरकारचा सर्वोच्च क्रिडा प्रशिक्षकांचा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त राजसिंग चिकारा यांची उपस्थीती महत्वाची ठरली. रायगड जिल्ह्यात कुस्तीचा प्रचार प्रसार व्हावा आणि  लहान थोर पुरुष व महिला मल्लांना प्रोत्साहित करावे याच उदात्त हेतूने राजसिंग चिकारा यांनी उपस्थिती नोंदविली होती, त्यांच्या समवेत सहाय्यक प्रशिक्षक कन्हैयालाल यादव हे देखील उपस्थित होते. या समयी केएटीएसपी मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, शिवसेना नेते पंकज पाटील, खोपोलीतील उद्योजक यशवंत साबळे, अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील, युवा उद्योजक विक्रम साबळे,  सामजिक कार्यकर्ते विक्रम पाटील, गुरुनाथ साठेलकर, महेश पवार, जितेंद्र सकपाळ, ईश्वर शिंपी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
             कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यासाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील कुस्तीपटूंना आपले प्राविण्य प्रदर्शित करण्याची संधी मिळावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे न्यासाचे अध्यक्ष राजाराम कुंभार यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले. येणाऱ्या काही दिवसात कुस्तीत आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पदक प्राप्त करणारे खेळाडू या स्पर्धांमधून तयार होतील असा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंकज पाटील आणि विठ्ठल मोरे यांनी यावेळी स्पर्धकांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या आणि आयोजकांचे कौतुक केले. कुस्तीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. 
         या भव्य स्पर्धेत प्रामुख्याने महाड, पनवेल, खोपोली, खालापूर, कर्जत, उरण पनवेल महानगरपालिका क्षेत्र येथील 130 हून अधिक पुरुष व महिला कुस्तीपटूंनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. सर्वं गटातील कुस्ती पटुंनी आपले कौशल्य पणाला लावून स्पर्धेची रंगत वाढवली होती. एकाहून एक सरस कुस्त्यांचा थरार सर्वांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा होता. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना रोख रकमेसह पदक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 
         खोपोली शहरातील महाराजा मंगल कार्यालयात गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत उत्साही वातावरणात ही स्पर्धा संपन्न झाली. सुसज्ज स्पर्धा व्यवस्था आणि प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीत सर्वच खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावून वाहवा मिळवली. अशा स्पर्धांचे आयोजन वारंवार व्हावे असा मनोदय राजसिंग चिकारा यांनी व्यक्त केला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्ती प्रशिक्षक संदीप वांजळे, क्रीडा प्रशिक्षक जगदीश मरागजे, अमित विचारे आणि कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार न्यासाच्या सर्वच कुस्तीपटूनी खूप मेहनत घेतली. या स्पर्धेत खालापूर तालुक्यातील कुस्तीगिरानी आपले वर्चस्व सिद्ध केले. कुस्तीत राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या क्षितिजा मरागजे, सोहेल शेख, प्रांजली कुंभार आणि श्रुती श्रीनाथ यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर