मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

 मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश




पाताळगंगा न्युज : नवज्योत पिंगळे 
खोपोली : ३० जुलै,
  
               मुंबई- गोवा महामार्गावर अपूर्ण असलेल्या कामांमुळे आणि खड्डयांमुळे प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळून नागरिकांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने  महामार्गावरील बायपास, सर्व्हीस रोड यांचे मजबुतीकरण करुन गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. 
              मुंबई-गोवा  महामार्गाच्या  जिल्हा प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जावळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हाशल्य चिकित्सक अंबादास देवमाने, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, राष्ट्रीय महामार्ग प्रकाल्प संचालक यशवंत घोटकर उपस्थित होते.
             महामार्ग प्राधिकरण आणि उपविभागीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष या महामार्गची पाहणी केली. ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी रायगड जिल्ह्यातील ३५  ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे सुचविण्यात आले आहे. या ठिकाणी आवश्यकते प्रमाणे तात्काळ डागडुजी, दुरुस्ती करण्याबाबत यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. प्रत्यक्ष जी कामे प्रस्तावित आहेत ती कामे पूर्ण करावीत. तसेच जी कामे प्रास्तावित नाही ती कामे प्रस्तावित करून राष्ट्रीय महामार्ग दिल्ली यांच्याकडून त्यासाठी मान्यता घेण्याची कर्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी यावेळी दिले. 
         गणेशोत्सवादरम्यान मुंबई- गोवा महामार्गावरुन लाखो चाकरमनी कोकणात जातात. या काळात त्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होणे आवश्यक आहे. यासाठी गणेशोत्सवापूर्वी या मार्गावरील कामामध्ये प्रस्तावित असलेल्या शक्य तेवढ्या मार्गाचे रुंदीकरण करुन घ्यावे. वाहतूक गतिमान होईल यासाठी खड्डे तात्काळ बुजवावे. संपूर्ण महामार्गावर दिशादर्शक बॅनर, बाण ठळक पणे लावावे. आवश्यकतेप्रमाणे ठीक ठिकाणी रिफ्लेक्टर लावावेत, गरज असलेल्या पुलावर सुरक्षेसाठी सुरक्षा जाळ्या लावाव्यात. अनेक ठिकाणी रस्त्यावर असलेले बांधकाम साहित्य, पावसामुळे वाहून आलेली रेती तसेच दगड हटविण्याची कार्यवाही करावी. रस्ता मोकळा करण्याचे निर्देशही दिले.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर