नागपंचमीनिमित्त सर्व जनजागृती कार्यक्रम खोपोलीत संपन्न

 नागपंचमीनिमित्त सर्व जनजागृती कार्यक्रम खोपोलीत संपन्न




पाताळगंगा न्युज : गुरुनाथ साठेलकर 
खोपोली : ९ ऑगस्ट,

          जनमाणसात साप या सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल अनेक समज गैरसमज आहेत.त्यातून अंधश्रद्धेचा खूप मोठा प्रभाव असल्याने सापांची भीती वाटत असते त्यातूनच सापांच्या हत्या होत असतात. सापांविषयीचा गैरसमज दूर करण्यासाठी नागपंचमीची औचित्य साधून "खोपोली खालापूर स्नेक रेस्क्यूर्सनी" सर्प जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या आयोजनात खोपोली बाजारपेठेतील श्री क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या सत्रात तर छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या सत्रात सहभाग नोंदवला होता. 
              सर्प अभ्यासक नवीन मोरे, योगेश शिंदे, सुनील पुरी, सुकृत गोटस्कर, सुशिल गुप्ता यांनी अत्यंत सोप्या शैलीत सापांविषयीची माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांकडून आलेल्या अनेक विविध शंका कुशंकाचे निरसन केले. सापांचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे या दृष्टिकोनातून आपल्या पूर्वजांनी अनेक विविध अंधश्रद्धा पसरवल्या होत्या त्या मागील वैज्ञानिक  कारणे विषद केली. 
         साप आपला मित्र कसा, सापाला ओळखायचे कसे, विषारी - बिन विषारी सापांची वर्गवारी, सर्पदंश टाळावा कसा, सर्प डूख धरतो की कसे, सर्पदंशावर वेळेवर उपचार किती गरजेचा आहे याबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले. गारुडी, मांत्रिक, बुवा, बाबा कशा पद्धतीने गैरसमज आणि अंधश्रद्धा पसरवतात याबद्दल देखील माहिती दिली. 
        भारतातल्या जवळपास सर्वच प्रजातींच्या सापांची चित्रपूर्ण माहिती प्रदर्शित करून विद्यार्थ्यांच्या मनात साप हा निसर्गातील अविभाज्य घटक असून जीवन साखळीतील त्याचे अनन्य साधारण महत्त्व पटवून देण्याचा हेतू सफल झाल्याचे प्रतिपादन या कार्यक्रमाच्या आयोजिका पौर्णिमा सुनील पुरी यांनी केले. खोपोलीतील प्राचीन भैरवनाथ शंकर मंदिराच्या प्रांगणात नागपंचमीच्या दिवशी विद्यार्थी आणि अनेक भाविक भक्तांच्या सानिध्यात उत्तरोत्तर रंगत जाणारा कार्यक्रम खूपच प्रेरणादायी होता. खोपोली आणि खालापूरतील अनेक सर्पमित्र या कार्यक्रमात उस्फुर्तपणे सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन