सारसन रस्त्यावरील खड्डे भरले, उद्योजक दीपक कडव यांचा पुढाकार,
पाताळगंगा न्युज :वृत्तसेवा
खोपोली : ७ ऑगस्ट
राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी खालापूर तालुक्यातील आपल्या गावभेट दौर्याचा शुभारंभ सारसन येथून केला.गावात येत असताना रस्त्यावर पडलेले प्रचंड खड्डे पाहून घारे यांनी जोरदार टीका केली होती. या रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याचे काम ग्रामपंचायतीने करण्याची गरज असताना निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सध्या झोपेत असल्याने सारसन येथील उद्योजक दीपक कडव यांनी हे खड्डे भरून ग्रामस्थांना दिलासा देण्याचे काम केले आहे.
खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या सारसन साजगाव रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने ग्रामस्थांना या रस्त्यावरून प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी खालापूर तालुक्यातील आपल्या गावभेट दौर्याचा शुभारंभ सारसन येथून केला. गावात येत असताना खड्डे पाहून घारे यांनी जेष्ठ पत्रकार बाबू पोटे यांच्या गावात येणार्या रस्त्याची अशी अवस्था असेल तर तालुक्यातील रस्ते कसे असतील असा सवाल करत आपण होडीतुन आलो की गाडीतून असे म्हणत टिका केली होती. पाहिल्याच पावसात खड्डे पडलेल्या या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले असताना ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी मात्र झोपेत होते.
रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यातून वाट काढताना विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, पादचारी आणि वाहन चालकांची होणारी कसरत पाहून सारसन येथील उद्योजक दीपक कडव यांनी खड्डे भरून ग्रामस्थांना दिलासा देण्याचे काम केले आहे. परिसरात असलेल्या कारखान्यांकडून या कामाचा मोबदला मिळेल न मिळेल मात्र लोकांची गैरसोय दूर होणे गरजेचे असल्याने आपण हे खड्डे भरल्याची प्रतिक्रिया दीपक कडव यांनी दिली आहे. माजी सरपंच भाऊ गायकवाड, शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख मोहन शिंदे यांनी या कामी पुढाकार घेतल्याने ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले असून सरपंच विनोद खवळे आणि सर्वच लोकप्रतीनीधीविषयी स्थानिकांकडून संताप व्यक्त होतोय.
प्रतिक्रिया
दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडतात. त्यामुळे कायमस्वरूपी हा प्रश्न सोडवण्याची गरज असताना ग्रामपंचायतीचे सरपंच आणि प्रशासन साधे खड्डे भरण्याचे सौजन्यही दाखवत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे.
बाबू पोटे
जेष्ठ पत्रकार, स्थानिक ग्रामस्थ
0 Comments