थोर इतिहासकार, विचारवंत प्रा.मा. म.देशमुख अनंतात विलीन
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : १९ मार्च,
आधुनिक भारताच्या खऱ्या इतिहासाचा शोध घेत, तो निर्भीडपणे समाजासमोर मांडणारे, आपल्या वाणी आणि लेखणीने विचारांना धार देणारे थोर इतिहासकार, तत्ववेत्ता, संशोधक आणि अभ्यासक प्रा. मा. म. देशमुख काळाच्या पडद्याआड गेले. बुधवार, १९ मार्च २०२५ रोजी पहाटे ३:१५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
देशमुख सर हे केवळ इतिहास सांगणारे नव्हते, तर तो जगणारे आणि लोकांच्या मनामध्ये चेतना निर्माण करणारे असामान्य विचारवंत होते. बहुजनांच्या मनाला, मेंदूला आणि मनगटाला सशक्त करणारे त्यांचे विचार हे समाजाच्या उन्नतीसाठी एक अमूल्य भांडार होते. सत्याला भिडण्याचे, अन्यायाविरोधात लढण्याचे आणि ऐतिहासिक सत्य बाहेर आणण्याचे कार्य त्यांनी संपूर्ण आयुष्यभर अखंडपणे केले.
त्यांच्या जीवनातील एक कटू सत्य म्हणजे, विचारांचा द्वेष करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधास ते धैर्याने तोंड देत राहिले.पण काळाने अखेर हा तेजस्वी सूर्य मावळवला.देशमुख सरांनी आपल्या प्रभावी अभ्यासाने आणि संशोधनातून इतिहासातील अंधार दूर करण्याचे कार्य केले. त्यांच्या लेखणीने अनेक पिढ्यांना प्रेरित केले. सत्य आणि न्यायासाठी अखंडपणे संघर्ष करणाऱ्या या महान इतिहास अभ्यासकाला राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
0 Comments