सन्मानापासून दुर्लक्षित असणाऱ्या महिलांचा सन्मान करणे हे, आमचे भाग्यच आहे - रायगड प्रेस अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांचे प्रतिपादन
जागतिक महिला दिनी सफाई कामगार, पत्रकार, आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा केला पत्रकारांनी सन्मान
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खोपोली : ८ मार्च,
जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र ठिकठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात आले. महिलांसाठी आरोग्य शिबिर, उल्लेखनीय कार्य महिलांचा गौरव, प्रबोधनात्मक कार्यक्रम असे विविध उपक्रमांनी महिला दिन साजरा करण्यात येत असताना याच अनुषंगाने रायगड प्रेस क्लब व खालापुर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नेहमीच सन्मानापासून दुर्लक्षित असणाऱ्या सफाई कामगार, आरोग्य विभागातील महिला कर्मचारी व महिला पत्रकारांचा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आल्याने सर्व महिला वर्गाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला तर सर्व स्तरातून रायगड प्रेस क्लब व खालापूर प्रेस क्लबच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तर कार्यक्रमाची प्रस्तावना खालापूर प्रेस अध्यक्ष भाई ओव्हाल यांनी व्यक्त करत प्रेस क्लबचा कार्याचा आढावा सदर केला.
गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना म्हणून रायगड प्रेस क्लब संलग्न असलेल्या खालापुर प्रेस क्लबची तालुक्यात ओळख असून या संघटनेच्या माध्यमातून आजवर अनेक समाज उपयोगी कार्यक्रम पार पडले असता यावर्षी प्रथमच रायगड प्रेस क्लब व खालापूर प्रेस क्लब असा संयुक्त जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम हाती घेत खऱ्या अर्थाने निस्वार्थीपणे समाजाची सेवा करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अल्टा कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी बाळराम म्हात्रे, खोपोलीचे उपमुख्याधिकारी रणजीत पवार, खालापूरचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम, उपपोलीस निरीक्षक रोहिदास भोर, पोलिस अधिकारी दिनेश भोईर, नगरसेवक निशांत पानपाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता वानखेडे, स्मिता तायडे, डॉ.रीना गायकवाड, डॉ.दिव्या परमार, स्टाफ नर्स राखी गिरी, डॉ.धनंजय तायडे, विनोद सोलंकी, महिला पत्रकार संतोषी म्हात्रे, सारिका सावंत, स्नेहल वालेकर, मानसी कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भाई ओव्हाल, सचिव रवींद्र मोरे, कार्याध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष एस.टी.पाटील, काशिनाथ जाधव, खजिनदार समाधान दिसले, सहखजिनदार संतोषी म्हात्रे, सदस्य राज साळुंखे, नवज्योत पिंगळे आदींनी मेहनत घेतली. तसेच यावेळी अल्टा कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी बाळाराम म्हात्रे, खोपोलीचे उपमुख्याधिकारी रणजीत पवार यांनी उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करत सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येत असून महिला दिन जगभरात महिला शक्ती, महिला स्वातंत्र्य आणि महिलांच्या सन्मानासाठी साजरा केला जातो. याच अनुषंगाने खोपोली नगरपालिका सफाई महिला कर्मचारी, खलापुर नगरपंचायत सफाई महिला कर्मचारी, खोपोली नगरपालिका रुग्णालय, खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र व पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला पत्रकार भगिनींच्या कार्याचा गौरव व्हावा आणि त्यांना त्या - त्या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने रायगड प्रेस क्लब व खालापुर प्रेस क्लब असा संयुक्त कार्यक्रम हाती घेत या खऱ्या अर्थानं समाजाची सेवा करणाऱ्या पण मान - सन्मानापासून दुर्लक्षित असलेल्या या महिला भगिनींचा सन्मान करण्यात आल्याने या सर्व महिला भगिनींच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला असून पत्रकार मंडळींनी घेतलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
याप्रसंगी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी आपली मत मांडताना म्हणाले की, जागतिक महिला दिनी असंख्य महिलांचा सन्मान करण्यात येतो, परंतु खऱ्या अर्थाने समाजाची सेवा मनापासून करत मान सन्मानापासून नेहमीच लांब राहिलेल्या महिला भगिनींकडे अनेकांचे दुर्लक्ष होत असल्याने या महिलांचा सन्मान करून त्यांच्या समाजसेवेची कौतुक करणे या उद्देशाने रायगड प्रेस क्लब व खालापूरचे प्रेस क्लबच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला तर सन्मानापासून नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या महिलांचा सन्मान करणे हे आमचे भाग्यच असल्याचे यावेळी प्रशांत गोपाळे यांनी मत व्यक्त केले
0 Comments