मुंबई पोलीस ओमकार निंबळे,व महाराष्ट्र केसरी उप विजेता सोहेल शेख यांचा खोपोलीत सन्मान
माय मराठी न्युज : गुरुनाथ साठेलकर खोपोली : २९ एप्रिल,
खोपोलीतील कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलात रायगड जिल्हा क्रीडाधिकारी पदावर दाखल झालेल्या प्रकाश वाघ यांच्या स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने मुंबई पोलीस दलात नियुक्त झालेल्या ओंकार निंबळे आणि महाराष्ट्र केसरीचा उपविजेता ठरलेल्या सोहेल शेख या कुस्तीपटूंचा सन्मान खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी प्रकाश वाघ यांनी खेळ आणि क्रीडांगण निर्मितीसोबत क्रीडा धोरणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सोयी सुविधा निर्माण करण्याकरिता मी सर्वतोपरी योगदान देण्याचा प्रयत्न करेन असे अभिवचन देताना स्व. भाऊसाहेब कुंभारांच्या नावाने निर्मित कुस्ती संकुलातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे कुस्तीपटू निर्माण होऊन जिल्ह्याचे नाव उज्वल करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न अधिकारी म्हणून नव्हे तर क्रीडा रसिक म्हणून अभिमानास्पद आहेत असे प्रतिपादन केले.
महाविद्यालयिन जीवनात डी. वाय. एस. पी. होण्याचे उद्दिष्ट मी निश्चित केले होते, म्हणूनच अभ्यासासोबत खेळातही प्राविण्य प्राप्त करून ते उद्दिष्ट साध्य करू शकलो असे सांगताना, पूर्वी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्याकरता पालक आग्रही असायचे तर हल्ली आपल्या मुलांनी मैदानी खेळ खेळावे यासाठी त्यांचे मागे लागत असतात, दुर्दैवाने ही पिढी मोबाईल सारख्या डिव्हाईसमधे गुंतत असताना या कुस्ती संकुलातले खेळाडू अंग मेहनती सोबत अभ्यासाकडे लक्ष देऊन स्पर्धा परीक्षेत आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश प्राप्त करत आहेत ही सकारात्मक बाब असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले.
खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण, गोदरेज ॲड बॉईज कंपनीचे सी एस आर प्रमुख तानाजी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते किशोर ओसवाल आणि महेंद्र सावंत यांनी देखील या प्रसंगी आपले विचार मांडले. लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या माजी अध्यक्षा शिल्पा मोदी, खोपोली शहर भाजप अध्यक्षा अश्विनी अत्रे, कुस्ती अभ्यासक लोखंडे काका यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राविण्य प्राप्त करण्याकरता कुस्तीपटू निर्माण व्हावेत यासाठी अत्याधुनिक यंत्रणा विकसित करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत राहणार आहोत अशा भावना कुस्ती संकुलाचे अध्यक्ष राजाराम कुंभार यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात व्यक्त केल्या. उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश मरागजे यांनी तर आभार प्रदर्शन गुरुनाथ साठेलकर यांनी केले. कुस्ती संकुलातील खेळाडू, पालक आणि कुस्ती शौकिन यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments