गुरुनाथ साठीलकर : प्रतिनिधी
खोपोली : ३१ मार्च,
खोपोली नगर परिषद परिक्षेत्रातील महिलांच्या सहभागातून स्वच्छोस्तव २०२३ अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वच्छोस्तवाचा शुभारंभ घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन आणि पुष्पमाला अर्पण करून करण्यात आला. यावेळी उपस्थित शेकडो महिलांनी हिरव्या रंगाचा वेष परिधान करून डोक्याला केशरी रंगाचा जरी पटका बांधला होता. अत्यंत शिस्तबद्ध स्वरूपात उपस्थित सर्व महिलांना स्वच्छतेची शपथ दिली गेली. त्यावेळी व्यासपीठावर विविध संस्थातील पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.
कुस्ती महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर पदक प्राप्त कुस्तीपटू मुलींनी स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या रॅलीचे मशाल घेऊन नेतृत्व केले. त्यांच्या मागे ई व्हेईकल अर्थात इलेक्ट्रिकल बाईक घेऊन प्रतिनिधीक स्वरूपात महिला सामील झाल्या होत्या. त्यांचे पाठोपाठ खोपोली शहरातील विविध संस्था, राजकिय संघटना, महिला बचत गटाच्या पदाधिकारी आणि शेकडो लहान थोर महिलांनी खोपोली शहरातून लायन्स क्लब ऑफ हॉल पर्यंत भव्य अशी रॅली काढली होती.
स्वच्छते संबंधात जनजागृती करणाऱ्या घोषणा दिल्या जात होत्या. लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या डॉ. रामहरी धोटे सभागृहात मशालीचे विसर्जन करून भव्य रॅलीचे सभेत रूपांतर झाले. स्त्री शक्तीला प्रेरक प्रतिमांचे पूजन करून दीप प्रज्वलानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली डॉ. रामहरी धोटे सभागृहाच्या व्यासपीठावर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे, उपमुख्याधिकारी गौतम बगळे, ऑफिस सुप्रिडेंट श्रीमती कदम, शिक्षण विभाग प्रशासकीय अधिकारी कुमारी जयश्री धायगुडे, नोडल ऑफिसर दिपक खेबडे, अभियंता विनय शिपाई, डॉ संगीता वानखेडे, माजी आरोग्य सभापती श्रीमती माधवी रिठे आणि शहर समन्वयक कु. भक्ती साठेलकर इ. मान्यवर उपस्थित होते.
स्वच्छोस्तवाच्या आयोजना संबंधी भक्ती साठेलकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कुमारी जयश्री धायगुडे, दिपक खेबडे आणि श्रीमती माधवी रिठे यांनी स्वच्छते बद्दल शासनाच्या धोरणाचे आणि नागरिकांच्या जबाबदारी संबंधी विस्तृत विश्लेषण केले. खोपोली शहरातील विविध संस्था आणि महिला बचत गट यांच्या माध्यमातून 'आनंद मेळ्याचे' आयोजन केले होते. त्यामध्ये विविध खाद्यपदार्थ, दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू, माती पासून बनवलेले साहित्य, आयुर्वेदिक औषधे आणि कचऱ्यापासून निर्माण केलेल्या सुंदर अशा वस्तूंची विक्री करणारे स्टॉल लावले होते.
आनंद बाजाराचे उद्घाटन उपमुख्याधिकारी बगळे यांनी केले.विविध क्षेत्रात विशेष गुणांकन प्राप्त केलेल्या महिलांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संपन्न झालेल्या करमणूक कार्यक्रमात महिला कलाकारांच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सांघिक अशा नृत्याविष्कार राचे सादरीकरण झाले. नृत्य नाटिकेतून स्वच्छते संबंधीचा संदेश प्रसारित करण्यात आला. या सर्व आयोजनात प्लास्टिक निर्मित वस्तूंचा वापर टाळण्यात आला आणि शून्य कचरा निर्मितीचे निकष पाळले गेले हे विशेष.
आयोजनात सहभागी झालेल्यांचे खेबडे यांनी आभार मानले. जगदीश मरागजे आणि श्रीमती अदिती पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. सायंकाळी ५:०० वाजता सुरू झालेले हे आयोजन रात्री ९:०० वाजे पर्यंत उत्साहात संपन्न झाले. खोपोली शहर आणि परिसरातील अनेकांनी या आयोजनात सहभागी होऊन आनंद आणि समाधान व्यक्त केले.
0 Comments