मनोज कळमकर : प्रतिनिधी
खालापूर : २४ मार्च ,
संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी यंदा राज्याला विशेष उपाययोजना कराव्या लागतील, असे सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले आहे. सद्यस्थितीत तालुक्यात असलेल्या धरणातील पाण्याचा उपयोग हा स्थानिक नागरिकांना कमी होत असून व्यावसायिक कारणासाठी उपसा अधिक होत आहे, त्यातच पाणी चोरीचे प्रकार वाढत असल्याने यावर कडक कारवाईची गरज असल्याचे बोलले जात आहे. खालापुरातील पाटबंधारे विभाग आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून त्यावर नियंत्रण आणणे आवश्यक झाले आहे.
खालापूर तालुक्यात चार मोठी धरणे आहेत. बारमाही पाणी असलेली पाताळगंगा नदी तसेच नैसर्गिक स्त्रोत विपुल असतानाही केवळ प्रशासकीय नियोजनशून्य कारभारामुळे खालापूर तालुका सातत्याने टंचाईग्रस्त यादीत येत आहे. पावसाळा संपताच खालापूर तालुक्यातील अनेक गावे व वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. विरोधाभास म्हणजे खालापूर तालुक्यातील या विपुल जलसंपदेवर या भागातील औद्योगिकीकरण बहरत असताना पिण्यासाठी आणि उन्हाळी शेतीसाठी
पाण्याचा दुष्काळ अशी परिस्थिती आहे. तालुक्यातील सर्वांत मोठे धरण असलेले मोरबा धरण ५० किलोमीटर अंतरावरील नवी मुंबईची तहान भागवते. मात्र, धरणालगतच्या गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. कलोते मोकाशी धरणातून मनोरंजन पार्क, लगतचे धनिकांचे फार्महाऊसला पाणी उचलायची परवानगी पाटबंधारे विभागाकडून मिळालेली आहे. तर खोपोली-पेण मार्गावरील डोणवत धरणावर अनेक पेयजल योजना कार्यान्वित असल्याने व्यावसायिक वापरासाठी पाणी उपसा सुरू राहिल्यास अनेक गावांना तीव्र पाणीटंचाई भेडसावू शकते.
चौकट -
मनोरंजन पार्कमध्ये पाणी उचलण्यासाठी मर्यादेची गरज कलोते मोकाशी धरण सिंचनासाठी असतानाही धरणालगत अतिक्रमण करून बांधलेल्या फार्म हाऊस; तसेच मनोरंजन पार्कमध्ये थेट धरणातून लाखो लिटर पाण्याचा उपसा केला जातो. तीन वर्षांपूर्वी कलोते ग्रामस्थानी ॲडलॅब मनोरंजन पार्कचा पाणीपुरवठा बंद करण्यासाठी आंदोलन केले होते. धरणातून थेट पाणी उपसाला मर्यादेची आवश्यकता आहे.
चौकट -
खालापुरातील धरणे आणि त्यांची साठवण क्षमता
मोरबा धरण - ३६० दशलक्ष घनमीटर
कलोते मोकाशी - ४.१९० द. घनमीटर
डोणवत - ३ दशलक्ष घनमीटर
भिलवले - २.१०० दशलक्ष घनलिटर
चौकट -
धरणातून अधिकृतपणे पाणी उचलण्याची परवानगी अनेकांनी घेतली आहे. त्यांचा पाणीपुरवठा बंद करू शकत नाही. जर कोणी अनधिकृतपणे पाणी उचलत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- भरत गुंटूरकर
(उपविभागीय अभियंता - पाटबंधारे विभाग कर्जत)
0 Comments