अजय गायकवाड : प्रतिनिधी नेरळ /कर्जत ८ एप्रिल
'व्यासपीठावर बसलेल्या कुणाचीच पार्श्वभूमी राजकीय नाही. ज्याच्यावर केस नाही तो शाखा प्रमुखच नाही बॅचलर ऑफ जेल ही पात्रता शिवसेनेच्या पदासाठी होती. आम्ही गद्दार आहोत असे हिणवले जाते. पण गद्दारी करायला कुणी लावली? शिवसेनेचे कार्यालय हे न्यायालय आहे. लोकांना न्याय मिळाला नाही की ते शिवसेनेच्या कार्यालयाकडे विश्वासाने येतात. आम्ही हिंदुत्वाशी प्रतारणा केली नाही. भगव्या झेंड्या करता आम्ही भाजप बरोबर युती करून सत्ता स्थापन की. राष्ट्रवादी काँग्रेसने तीन वेळेस शिवसेना पक्ष फोडला. आमचे शिवसेनेसाठी सारे काही भोगले, जेल भोगली. आम्हाला गद्दार म्हणता आणि काहींना खुद्दर म्हणत असाल तर ते चुकीचे आहे. या मतदार संघातील सर्व गावांसाठी पाणी योजना मंजूर केला आहेत. सुमारे पावणे चारशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या योजना योग्य रीतीने पूर्ण झाल्यास नुसत्या पाण्यावर थोरवे निवडून येतील. महाराष्ट्रातील ३८ हजार गावांना पाणी योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.' असे महत्वपूर्ण प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे केले.
आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता. यावेळी विविध लोकोपयोगी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने दुपारी अपंग व्यक्तींना अन्नधान्य किट व उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यानंतर कर्जत व खालापूर तालुक्यातील महिला बचत गटांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करून महिला बचत गटांना टेंट चे वाटप करण्यात आले.
सायंकाळी कर्जत शहरातील 'बाळासाहेब भवन' या सुसज्ज अशा जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग व पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्यासह उप जिल्हाप्रमुख भाई गायकर, अमर मिसाळ, मनोहर थोरवे, नगरसेवक संकेत भासे, उल्हास भुरके, गोविंद बैलमारे, संतोष भोईर, कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप, विजय पाटील, शिवराम बदे आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत पंकज पाटील आणि नगरसेवक संकेत भासे यांनी केले. यावेळी मोफत फिरत्या दवाखाण्याचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आमदार भरत गोगावले यांनी 'या भागातील मुख्य रस्त्यासाठी 'ऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आला आहे. जल जीवन मिशनच्या माध्यमातूनही भरीव निधी या मतदार संघासाठी मिळाला आहे. राज्याची सत्ता बदलण्याचा उठाव रायगडा मधून झाला. मात्र आम्ही मागे राहिलो आहोत. आमचे आमदार व मंत्री जमिनी वरूनच चालत आहेत. कोणाच्याच डोक्यात हवा गेलेली नाही. त्यामुळे चांगलेच काम करू.' असा विश्वास व्यक्त केला. खासदार श्रीरंग बारणे यांनी, 'लोकांमध्ये राहून लोकांच्यासाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणजे महेंद्र थोरवे. त्यांची काम करण्याची पद्धत फार वेगळी आहे.' असे सांगितले. उदय सामंत यांनी, 'कुणी कितीही टीका केली आरोप केले तरी पुढील आमदार महेंद्र थोरवेच असतील. पाठपुरावा करायचा असेल तर त्यांनीच करावा. २८८ पैकी थोरवे हे एकमेव आमदार निधी आणण्यात वाकबदार आहेत. मलाही त्यांच्याकडे त्या विषयाची शिकवणी लावावी लागणार आहे.' असे स्पष्टपणे सांगितले.
आमदार थोरवे यांनी आपल्या मनोगतात अगदी भावनावश होऊन आपली जीवन कहाणी सांगितली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांसह सर्वांचेच डोळे पाणावले. त्यांनी सत्ता बदलाबद्दल सांगताना, ' आम्ही तिघे शिवसेनेचे असताना पालक मंत्रीपदी शेंबडी पोर बसवली. अडीच वर्षे आम्ही खूप हालातीत काढली. त्यावेळीच पालक मंत्री हटविल्या शिवाय शांत बसणार नाही. असा पण केला आणि तो पूर्ण झाला.' असे स्पष्ट केले. याप्रसंगी माथेरानचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस शहर अध्यक्ष मनोज खेडकर, माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, वर्षा शिंदे, सुनील शिंदे यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी सभास्थान खचाखच भरले होते. सूत्रसंचालन अभिषेक सुर्वे यांनी केले.
0 Comments