संजय कदम पनवेल १ जुलै,
पनवेल तालुक्यातील कालवरी - लांगेश्वर येथील शिवशंभो देवळात चोरी करणाऱ्या अल्पवयीन चोराला पकडल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र मंदिराचे विश्वस्त पांडुशेठ घरत यांनी त्याच्याविरोधात तक्रार न देता त्या पोराला सुधारण्याची संधी दिली. याबाबदल संपूर्ण पंचक्रोशीत त्याच्या मोठेपणाचा कौतुक होत आहे.
पनवेल तालुक्यातील कालवरी - लांगेश्वर येथील पांडुशेठ पुंडलिक घरत यांनी त्यांच्या आई - वडिलांच्या स्मरणार्थ शिवशंभो मंदिर बांधले आहे. गेल्या काही दिवसांपासून देवळाच्या तिजोरीतून पैसे गायब होत होते. तिजोरीतील १००, २००, ५०० रुपयांच्या नोटाच गायब होत होत्या. देवळाच्या बाहेर सीसीटीव्हीत चोर दिसून येत नसल्याने अखेर पांडुशेठ घरत यांनी मंदिराच्या आत सीसीटीव्ही बसवले. या कॅमेऱ्यात चोरटा अलगद सापडला. सदर चोर अल्पवयीन असून तो अमीर खानच्या पिके चित्रपटातील तिजोरीतील पैसे चोरी करण्याची ट्रिक वापरून मंदिरात चोरी करीत होता. अखेर त्याला रंगेहात पकडल्यानंतर त्याने उलवे येथील विराज आणि शर्मा या आपल्या आणखी दोन साथीदाराची नावे सांगितली. पांडुशेठ घरत यांनी अल्पवयीन चोराला पकडल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र त्याच्याविरोधात तक्रार न देता त्या पोराला सुधारण्याची संधी दिली. पोलीस सध्या त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध घेत आहेत. कोवळ्या मुलाच्या चुकीबद्दल त्याचे आयुष्य खराब न करता त्याला सुधारण्याची संधी दिल्याबद्दल पांडुशेठ घरत यांचे संपूर्ण पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
0 Comments