खोपोली आणि रायगड पोलिसांची कारवाई,१०७ कोटी ३० लाख ३७ हजार ३७७ रूपये किंमतीचे एम. डी. ड्रग्ज जप्त,तीनआरोपींना घेतले ताब्यात

 खोपोली आणि रायगड पोलिसांची कारवाई,१०७ कोटी ३० लाख ३७ हजार ३७७ रूपये किंमतीचे एम. डी. ड्रग्ज जप्त,तीनआरोपींना घेतले ताब्यात






पाताळगंगा न्यूज :  हनुमंत मोरे
खोपोली/वावोशी : ८ डिसेंबर 


            खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील मौजे ढेकु गावचे हद्दीत इंडीया इलेक्ट्रीक पोल्स मॅन्युफॅक्चरींग कंपनी या नावाचा बोर्ड लावुन आतमध्ये मात्र अंचल केमिकल या नावाने केमिकल बनवण्याचा व्यवसाय करणा-या कंपनीमध्ये प्रतिबंधीत केलेले अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे तयार केले जात असल्याबाबत खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांना गोपनीय माहीती प्राप्त झाली होती, सदर गोपनीय माहीती ही वरीष्ठांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कारवाईच्या अनुषंगाने मार्गदर्शन व सूचना प्राप्त करुन उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर विक्रम कदम व खोपोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत तसेच खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी इंडीया इलेक्ट्रीक पोल्स मॅन्युफॅक्चरींग कंपनी मध्ये कायदेशीर पद्धतीने छापा घालण्यात आला असता यामध्ये पक्का माल असलेली पावडर ही नार्को इन्स्पेक्शन कीट (Narco Inspection kit ) द्वारे तपासणी केली असता सदर तयार केलेला माल हा एम. डी. म्हणजेच मेफेड्रॉन (Mephedrone) असल्याचे निष्पन्न झाले.याची किंम्मत १०७ कोटी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिस अधीक्षक रायगड सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले.
                 दिनांक ०७/१२/२०२३ रोजी पोलीस पथकाने
मौजे ढेकु गावचे हद्दीत इंडीया इलेक्ट्रीक पोल्स मॅन्युफॅक्चरींग कंपनीत प्रवेश केल्यानंतर कंपनीचे चालक यांचेकडे सदर ठिकाणी रासायनिक पदार्थ निर्मिती करणेसाठी आवश्यक असणारा शासनाचा कोणताही वैध परवाना मिळून आला नाही. त्या ठिकाणी उग्र वास येत असल्याचे व काही कच्चा माल, तसेच त्याचेवर प्रक्रीया करण्यासाठी आवश्यक साधन सामग्री असेंबल केल्याचे दिसून आले. यामध्ये गूंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परीणाम करणारे पदार्थ अधिनियमातील तरतुदीप्रमाणे कारवाई सुरु करण्यात आली. याबाबत तयार पक्का माल असलेली पावडर ही नार्को इन्स्पेक्शन कीट (Narco Inspection kit ) द्वारे तपासणी केली असता सदर तयार केलेला माल हा एम. डी. म्हणजेच मेफेड्रॉन (Mephedrone) असल्याचे निष्पन्न झाले.

 कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला मुद्देमाल -
         
  १. जप्त केलेला तयार मुद्देमाल - रु.१०६५ दशलक्ष किमतीचे एकूण वजन ८५ किलो २०० ग्रॅम. डी. पावडर
२. जप्त केलेला कच्चा मुद्देमाल - रु. १५,३७,३७७/- किंतीची एम. डी. पावडर बनवण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने मिळाली.
३.जप्त केलेला इतर मुद्देमाल - रु. ६५,००,०००/- किंमतीची रासायनिक प्रक्रीयेसाठी असेंबल केलेली साधन सामग्री मिळाली.
वरील सर्व मुद्देमालाची एकुण किंमत १०७ कोटी ३० लाख ३७ हजार ३७७ रुपये (अक्षरी रुपये एकशे सात कोटी तीस लाख सदतीस हजार तीनशे सत्याहत्तर मात्र ) असुन सदर मुद्देमाल व मालमत्ता जप्त करुन सील करण्यात आलेली आहे.या कारवाईमध्ये तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सदर बेकायदेशीर कंपनी देखील सील करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

               सदर कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार(कोकण परीक्षेत्र),पोलीस अधिक्षक, रायगड सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधिक्षक,रायगड अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खालापूर यांच्या नेतृत्वाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, सहा. पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर,प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने,अभिजीत व्हरांबळे, पोहवा /२०७२ राजेंद्र पाटील, पोहवा/२१३० सागर शेवते, पोहवा/१०८६ प्रसाद पाटील,मपोहवा/५३ आर.एन. गायकवाड, पोना/२२७४ सतीष बांगर, पोना/११३५ कुंभार, पोशि/५६६ आर.डी. चौगुले, पोशि/४५६ राम मासाळ, पोशि/१८४९ प्रदीप खरात या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.
            पोलीस पथकाने २४ तास अथक मेहनत करुन कारवाई पूर्ण केली आहे. याबाबत खोपोली पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. ३६४/२०२३ गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(c), २२ (c) सह कलम २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खोपोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार