माथेरान न.प.च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन
पाताळगंगा न्यूज : मुकुंद रांजाणे
माथेरान : १४ डिसेंबर,
माथेरान नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर, प्रा. शांताराम यशवंत गव्हाणकर आणि सेंट झेवीयर्स इंग्लिश हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषदेच्या माध्यमातून वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर या शाळेच्या प्रांगणात सायंकाळी सात वाजता वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले.
यावेळी ग.ए.ट्रस्टचे विश्वस्त शशिभुषण गव्हाणकर, सहायक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमास लाभली.प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सचिन भोईर, गव्हाणकर शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील आणि इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका सिसेलिया परेरा यांनी या भव्यदिव्य कार्यक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य केले.
माथेरान मध्ये असंख्य शालेय विद्यार्थी आजही आपल्या अंगीकृत असणाऱ्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी संधी पहात असतात. अशी नामी संधी केवळ वर्षातून एकदाच या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून त्यांना लाभते. प्रत्येक क्षेत्रात मुलींनी बाजी मारली आहे त्याप्रमाणे या स्नेहसंमेलनात तीनही शाळेच्या सर्वच विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता. यातील मंगळागौराच्या अप्रतिम सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तसेच देशभक्ती गीते,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भीमगीते,कोळी गीते,गाणकोकिळा स्व.लता मंगेशकर यांच्या बालपणापासूनचा एकंदरीत जीवनपट सुध्दा विद्यार्थ्यांनी सादर केला.
एकांकिका त्याचबरोबर एकविरा देवी आणि हिंदी चित्रपटातील गाण्यावर सुध्दा उत्तम नृत्य सादर करण्यात आले.तीनही शाळेतील शिक्षकांनी सुध्दा आपले नृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी, विविध संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ,महिला पालकवर्गाची संख्या लक्षणीय होती या अप्रतिम भव्यदिव्य कार्यक्रमाचे प्रत्यक्ष साक्षीदार पर्यटक सुध्दा झाले होते त्यांनी या वार्षिक स्नेहसंमेलनातील विद्यार्थ्यांचे कलागुण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात बंदिस्त केले.
यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सचिन भोईर,शिक्षक दिलीप आहिरे, लक्ष्मण ढेबे, अनिश पाटील,साक्षी कदम, संतोष चाटसे, गव्हाणकर शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील, रमेश ढोले, संघपाल वाठोरे, विदुला गोसावी, शाळेचे लिपिक विनोद जाधव,इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका सिसेलिया परेरा यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडले.
0 Comments