कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता वृक्षारोपण केले तर त्याचा सर्वांना नक्कीच उपयोग होईल रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे
पाताळगंगा न्युज : गुरुनाथ साठेलकर
खोपोली : ३० जून,
रोटरी क्लब अलिबाग तसेच माणुसकी प्रतिष्ठान जितनगर वायशेत यांच्या संयुक्त विद्यमाने मयेकर डोंगरी थळ येथे रोटरी जंगल कन्सेप्ट मध्ये ९०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ अलिबाग शीशोर, माणुसकी प्रतिष्ठान, रायगड मेडिकल असोसिएशन, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था तसेच इतर स्वयंसेवी संस्था ,थळ ग्रामपंचायत, ग्रामस्थ, सरपंच व कर्मचारी अधिकारी वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ९०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी येथे जमलेल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व व त्यामुळे आपले भविष्य कसे उज्ज्वल होईल याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच १ जुलै रोजी नवीन भारतीय न्याय संहिता बद्दल जनजागृती करण्यासाठीचे आवाहन करण्यात आले. रोटरी अध्यक्ष डॉक्टर निलेश म्हात्रे यांनी यावेळी उजाड झालेल्या रानात दाट जंगल तयार करून जंगली प्राणीमात्रांना सुरक्षित वातावरण मिळणे ही या मागची संकल्पना असल्याचे सांगितले.
तर माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवान यांनी वृक्षांच्या रोपणाबरोबरच त्यांचे जतन व संवर्धन करणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच याकरिता उन्हाळ्यात रोपांना पाणी देवून त्यांना जगविणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी दरवर्षी वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो यावर्षी १५ ऑगस्ट रोजी वृक्षांचा चौथा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जन शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, रायगड मेडिकल असोसिएशन समन्वयक डॉ. सिद्धार्थ कुलकर्णी, थळ ग्रामपंचायत सरपंच सुनील पत्रे, रोटरी भावी अध्यक्ष दिलीप कुमार भड, तसेच इतर स्वयंसेवी संस्थांचे सदस्य व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. तन्वी शेट्ये यांनी कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे नियोजन केले.
0 Comments