पनवेलकर खेळाडूंसाठी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आम. प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भव्य उद्घाटन
माय मराठी न्युज : गुरुनाथ साठेलकर
खोपोली : २ मे,
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार क्रीडा व युवक संचालनालय रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अधिपत्याखाली पनवेल तालुका क्रीडा संकुलात क्रीडा कौशल्य आणि व्यक्तिगत विकास शिबिराचे उद्घाटन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आंतरराष्ट्रीय नेमबाज तथा अर्जुन, द्रोणाचार्य आणि महाराष्ट्र शासनाच्या जिजामाता पुरस्कार विजेत्या सीमा शिरूर यांचे हस्ते संपन्न झाले.
साधारणत: दीड महिना चालणाऱ्या या शिबिरासाठी दीडशेहून अधिक खेळाडूंची प्राथमिक स्वरूपात नोंदणी झालेली आहे.अशी माहिती प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी दिली.दहा ते बारा क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांकडून विनामूल्य स्वरूपात देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम.प्रशांत ठाकूर आणि पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांनी प्रत्येक प्रशिक्षणार्थीना आकर्षक ड्रेस कोड आणि संसाधने उपलब्ध करून दिली.
आम. प्रशांत ठाकूर यांनी या संकुलातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी संकुल समिती सर्वतोपरी प्रयत्न करेल, त्याचप्रमाणे अध्यावत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, त्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. आंतरराष्ट्रीय नेमबाज व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्या प्राजक्ता अंकोलेकर, साउथ एशियन गेम्स २०२२ मध्ये कांस्य पदक प्राप्त मानवी शर्मा यांचा यावेळी आम. प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सन्मान केला गेला.
आंतरराष्ट्रीय नेमबाज सीमा शिरूर यांनी प्रशिक्षणार्थी मार्गदर्शन करताना आपला जीवन प्रवास विषद केला. मेहनत आणि जिद्दीच्या बळावर योग्य ते ध्येय साध्य करता येईल असा सल्लाही दिला.
पनवेलचे उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी प्रशिक्षणार्थी खेळाडूंना शुभेच्छा तर अर्जुन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी विविध क्षेत्रातले मान्यवर, खेळाडू आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments